मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काल मुंबई दौऱ्यावर आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे यावेळी ते काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासंबंधी व फिल्मसिटीसाठी चर्चा करण्यासाठी मुंबईत आले आहेत. यावर मनसेने आक्षेप घेत त्यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. ते ज्या ठिकाणी आले आहेत, त्या हॉटेलखाली बॅनर लावले आहेत. मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला 'ठग' असे बॅनर लावून योगींचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - किंग खानने विकत घेतला नवीन क्रिकेट संघ
काल योगी आदित्यनाथ हे मुंबईतील ट्रायडन्ट हॉटेल येथे आले आहेत. ते उत्तरप्रदेशात गुंतवणूक व फिल्मसिटी व्हावी यासाठी सेलेब्रिटी व उद्योजक यांच्याशी चर्चा करणार आहेत. योगींच्या या दौऱ्यावर काँग्रेस नेत्यांनी अगोदरच निशाणा साधत टीका केली. मात्र त्यात मनसेनेही योगींच्या दौऱ्याला विरोध केला आहे. कालच रात्री ट्रायडन्ट हॉटेलखाली मनसे घाटकोपर विभागप्रमुख गणेश चुक्कल यांनी बॅनर लावत योगींच्या दोऱ्याला विरोध केला आहे.
बेरोजगारी लपवण्यासाठी व उद्योग लपवण्यासाठी आलेला ठग -
मनसेने लावलेल्या बॅनरवर म्हटले आहे की, ''कहा राजा भोज ... और कहा गंगू तेली... " कुठे महाराष्ट्राचं वैभव... तर कुठे युपीचं दारिद्र्य ... " भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपटसृष्टी, युपीला नेण्याचे मुंगेरीलालचं स्वप्नं." अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला 'ठग' असे चुक्कल यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने योगी यांच्या दौऱ्यावर साधला होता निशाणा -
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. बॉलिवूड निर्मात्यांसोबत तसेच राज्यातील उद्योजकांसोबत चर्चा करणार आहेत. एकंदरीत उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणूक वाढवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. आमचा त्यांना सल्ला आहे की, उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. या विषयाकडेदेखील त्यांनी लक्ष केंद्रीत करावे, असे सचिन सावंत म्हणाले आहेत. यावेळी, योगी यांच्या भेटीनंतर बॉलिवूडधील निर्मात्यांवर जोर-जबरदस्ती केली जाऊ शकते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.