मुंबई - 50 वर्ष चित्रपट सृष्टीची सेवा करणाऱ्या अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी मनसे नेते अमेय खोपकर यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. प्रख्यात मराठी अभिनेत्री सुलोचना लाटकर म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या सुलोचनादीदी यांना केंद्र सरकारने मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव करावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करत आहोत. याविषयीचं सविस्तर पत्रही माहिती प्रसारण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांना देणार आहोत. गेली अनेक वर्ष सातत्याने ही मागणी जोर धरत असताना आता यावर्षी तरी सरकारने गांभीर्यपूर्वक या मागणीचा विचार करावा, असे ट्विट खोपकर यांनी केले आहे.
250 हून अथिक मराठी चित्रपटात काम
सुलोचनादीदींनी जुन्या पिढीतील दिग्गज अभिनेत्यांसह अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेंद्रकुमार, शशी कपूर आदींसोबत पडद्यावर तोडीस तोड अभिनय केला आहे. खानदानी अभिनय आणि विनम्र स्वभाव यामुळे भारतीय सिनेसृष्टीत दीदींनी मानाचं स्थान मिळवलं आहे. कृष्णधवल सिनेमा पासून सुरू होऊन रंगीत सिनेमापर्यंत पोहोचलेल्या चित्रपट प्रवासाच्या त्या साक्षीदार राहिल्या आहेत. सुलोचना दीदींचं मूळ नाव सुलोचना लाटकर आहे. कोल्हापूरमधल्या खडवलट गावी सुलोचना दीदींचा जन्म झाला. २५० हून अधिक मराठी आणि १५० हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
हेही वाचा - निकिता तोमर हत्याकांड : तौसिफ आणि रेहान दोषी; शुक्रवारी जाहीर होणार शिक्षा