मुंबई - राज्यात आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना आता सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पदाधिकाऱ्यांसोबत वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्रिकेट क्लब येथे महत्वाची बैठक (MNS Workers Meeting) बोलावली होती. निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
- काय ठरलं बैठकीत?
पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, तुमच्या मनात विषय येत असेल युतीचं काय होणार? युती होईल की नाही ते पुढे बघू पण तुमची स्वतंत्र लढण्याची तयारी असली पाहिजे. तुम्ही युतीच्या चर्चेत पडू नका. निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागा. विधानसभानुसार कमिटी नेमली जाणार आहे, मग ही कमिटी अहवाल तयार करणार आहे.
यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, राज ठाकरे यांनी सर्व जागांवर चाचपणी करण्याचे आदेश दिले आहेत. 15 फेब्रुवारीपर्यंत आमच्या समितीचा अहवाल प्राप्त होईल. युती झाल्यास आणि युती न झाल्यास काय रणनिती असली पाहिजे या संदर्भात राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
- शिवसेना एकटी पडलेय-
नवीन प्रभाग रचनेवर संदीप देशपांडे म्हणाले की, शिवसेनेने स्वतःला अनुकूल प्रभाग रचना केली आहे. अशा फक्त चर्चा आहेत. सेनेसोबत कोण आहे? हिंदू मतदार? मराठी मतदार? कोण आहे? शिवसेना एकटी पडली आहे. ही प्रभाग रचना म्हणजे आजचे मरण उद्यावर ढकलल्यासारखे आहे.
दरम्यान, आज 12 वाजल्यापासून बैठकीला सुरुवात झाली होती. या बैठकीसाठी राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि ठाण्यातील तसेच इतर शहरातील मनसेचे पदाधिकारी आणि नेत्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ही बैठक पार पडली.