मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे. यासाठी मनसेचे एक शिष्टमंडळ येत्या आठवड्यात अयोध्येसाठी रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या दौऱ्याला भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी विरोध केला आहे.
मनसेकडून जोरदार तयारी! राज ठाकरे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने ते आयोध्या आणि शरयू नदीकाठी शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील मनसेचे कार्यकर्ते अयोध्येत दाखल होणार आहेत. यासाठी मनसेतर्फे सुमारे १० ते १२ रेल्वे गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. या दौर्याच्या नियोजनासाठी मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
हेही वाचा - State Election Commission : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाची जोरदार तयारी
अयोध्या दौऱ्याला भाजपा खासदाराचा विरोध? - राज ठाकरे येत्या ५ जून रोजी आयोध्या दौऱ्यावर जाणार असून त्यासाठी मनसेकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरू करण्यात आली आहे. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही असा इशारा भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी दिला आहे. इतकेच नव्हे तर राज ठाकरे यांचा माफीनामा येत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यांची भेट घेऊ नयेत असा सल्लाही त्यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी सातत्याने उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी सार्वजनिकरित्या हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, मगच अयोध्येत प्रवेश करावा, अशी मागणी बृजभूषण यांनी केली आहे.
भाजपा व मनसे युतीवर परिणाम? - राज्यात मशिदीवरील भोंग्या संदर्भात राज ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत असताना आता राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदाराकडून विरोध करण्यात आल्याने भाजप व मनसे युती वरही त्याचे परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाने उघडपणे मनसेबरोबर युती केली तर भाजपला पुढील वर्षी होणाऱ्या मध्य प्रदेश व राजस्थान या दोन मोठ्या राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये नुकसान होऊ शकते असेही सांगितले जात आहे.