मुंबई - मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाकांक्षी असा ३३.५ किमीचा कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो ३ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पातील आणखी एक मोठा टप्पा अखेर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) पार केला आहे. हा टप्पा म्हणजे विधान भवन मेट्रो स्थानकाचा साचा अखेर पूर्ण करण्यात आला आहे. त्यानुसार आता लवकरच उर्वरीत काम पूर्ण करत हे मेट्रो स्थानक उभारण्यात येणार आहे.
![mmrc completes structure of vidhan bhawan station](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-05-7209214-mmrc-metro3-station-vidhanbhavan_02092020191218_0209f_1599054138_955.jpg)
पूर्णतः भुयारी मेट्रो असलेल्या या प्रकल्पातील मेट्रो स्थानके 'कट अँड कव्हर' पध्दतीने बांधण्यात येत आहेत. त्यानुसार विधान भवन मेट्रो स्थानकाचे काम पॅकेज १ अंतर्गत करण्यात येत आहे. आता हे काम पुढे गेले असून विधान भवन मेट्रो स्थानकाचा साचा दिसू लागला आहे. त्यानुसार आता खाली स्थानकाचे ७५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली आहे. तळाची स्लॅब (base slab), मॅझेनाईन स्लॅब (mezzanine slab), कॉनकोर्स स्लॅब (concourse slab) आणि छताची स्लॅब (roof slab) अशा स्वरूपाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता हे स्थानक दृष्टीक्षेपात आले आहे.
![mmrc completes structure of vidhan bhawan station](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-05-7209214-mmrc-metro3-station-vidhanbhavan_02092020191218_0209f_1599054138_820.jpg)
याआधी एमएमआरसीने पॅकेज ७ मधील एमआयडीसी मेट्रो स्थानकाचा साचा तयार करण्यात आला आहे. तर स्लॅबचे कामही पूर्ण झाले आहे. तर पॅकेज १ मधील चर्चगेट, हुतात्मा चौक आणि कफ परेड स्थानकाचेही काम वेगात सुरू असल्याचे देओल यांनी सांगितले आहे. विधान भवन मेट्रो स्थानकाला सात एन्ट्री-एक्झिट असणार आहेत. तर या स्थानकाचे काम अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी सुरू आहे. तरीही हे काम योग्य प्रकारे पूर्ण करता येत असल्याबद्दल एमएमआरसीने समाधान मानले आहे.