मुंबई - माजी सदस्य दिवंगत पांडुरंग जयराम हजारे यांना विधान परिषदेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रामटेक मतदार संघाच्या विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले, अशा शब्दात सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. आज विधान परिषदेत दिवंगत हजारे यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
सभापती नाईक-निंबाळकर म्हणाले, पांडुरंग हजारे यांचा जन्म 18 जानेवारी, 1928 रोजी नागपूर जिल्ह्यात कुही तालुक्यातील अंबाडी येथे झाला. त्यांचे शिक्षण इंटर (आर्टस्) पर्यंत झाले होते. दिवंगत हजारे यांनी रामटेक नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, जगदंबा महिला औद्योगिक सहकारी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, नागपूर जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष, महाराष्ट्र जनता दलाचे उपाध्यक्ष तसेच त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही उत्तम कार्य केले होते.
नागपूर जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. दिवंगत हजारे हे सन 1985 व 1990 असे दोन वेळा नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेवर तर सन 1996 मध्ये महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा महाराष्ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झाले होते. शनिवार 1 जून, 2019 रोजी त्यांचे निधन झाले. सभागृहनेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा शोकप्रस्ताव मांडला. या शोकप्रस्तावावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कामगार राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, डॉ. निलम गोऱ्हे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.