मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा उलगडा होत नाही, त्यातच त्याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या आत्महत्येचे नवीन गूढ निर्माण झाले आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा थेट संबंध असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. दिशा सालियनचा 'लिव्ह इन पार्टनर' रोहन रॉय याची चौकशी करावी. पण या प्रकरणातील त्याचे महत्त्व लक्षात घेता त्याला सुरक्षाही द्यावी, अशी विनंती भाजपा आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केली आहे.
दिशा सालियनचा मृत्यू झाला त्यावेळी रोहन रॉय तिथे उपस्थित होता. त्यामुळे त्याचा जबाब दिशा सालियन आणि सुशांतच्या मृत्यूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. रोहन रॉय हा जीवाच्या भीतीपोटी मुंबईतून आपल्या गावी निघून गेला आहे. त्याचा सीबीआयच्या चौकशीत जबाब महत्त्वाचा असल्याचे नितेश राणे यांनी अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. सीबीआय आणि एनसीबीच्या चौकशीत सत्य बाहेर येईल, पण ८ जूनच्या पार्टीत काय घडले? ८ जून रोजी दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. त्यानंतर १४ जूनला सुशांतने देखील आत्महत्या केली. त्यामुळे दिशा सालियन आणि सुशांतच्या आत्महत्येचा थेट संबंध असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
८ जूनला दिशा ज्या पार्टीत होती, तिथे तिच्यासोबत काही चुकीचे झाले होते. ती तिथून निघाली होती. त्यावेळी तिने सुशांतला फोनही केला होता. यावेळी दिशासोबत रोहन रॉय हा होता. दिशा इमारतीवरून पडली तेव्हा रोहन रॉय याने तातडीने खाली येणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. रोहन रॉय हा तब्बल 25 मिनिटांनी खाली आला. त्यामुळे रोहन रॉयची सीबीआय चौकशी होणे गरजेचे असल्याचे नितेश राणे यांनी पत्रात लिहिले आहे.