मुंबई - आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाबाहेर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. यावेळी त्यांनी मागण्यांचा फलक पाठीवर बांधला होता. धनगरांना आरक्षण देण्याबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं विरोधी धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला. पडळकर यांनी अनोख्या पारंपारिक धनगर वेशभूषेत ढोल वाजवत आंदोलन केले. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकरा सकारात्मक नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विधानभवन परिसरात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी पडळकरांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते आक्रमक झाले. लोकशाही मार्गाने आंदोलन करत असूनही सरकार पोलिसांमार्फत दडपशाही करत असल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी पडळकर यांच्या पाठीवरील मागण्यांचा फलक काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पडळकरांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला. अखेर पोलिसांनी पडळकर यांना बाजूला आणले. तसेच त्यांच्या पाठीवरील फलक काढण्यात आला.