मुंबई- आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा चांगला निर्णय घेतला. यामुळे महाराष्ट्राला दहा ते वीस हजार कोटींचे नुकसान होत असल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला. यामधील घोटाळ्याची चौकशी करण्याचे पत्र त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लिहिले आहे.
रेडीरेकनरच्या निर्णयाबाबत स्थगिती द्यावी, अशी मागणी भाजप आमदार अमित साटम यांनी केली आहे. आमदार अमित साटम म्हणाले, की मुंबईतील काही सरकारी जमिनींचे रेडी रेकनर दर कमी करून घोटाळा करण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे.
हा आहे भाजपचा आक्षेप-
महाराष्ट्रात रेडी रेकनरचे दर लवकर जाहीर केले नव्हते. त्यामुळे भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर रेडीरेकनरचे दर जाहीर झाले. मात्र 50 टक्क्यांनी सरकारी जागांचे दर कमी करण्यात आल्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. यामुळे महाराष्ट्राला दहा ते वीस हजार कोटींचे नुकसान होत असल्याचा आरोप साटम यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेडिरेकनर संदर्भात स्थगिती द्यावी, असे पत्र लिहूनही त्यांच्याकडून कोणतीही दाद मिळाली नाही. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना पत्र लिहून रेडीरेकनर दरामधील घोटाळ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, मुद्रांक शुल्क केल्याने बांधकाम विकासकांमधून राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले होते.