मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर भाजपने राज्यमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. या घटनेनंतर राठोड देखील गेल्या तीन दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे याघटनेचे गूढ वाढले आहे. मात्र, दोन दिवसांपासून राठोड यांची गाडी मंत्रालयाच्या पार्किंग प्रांगणात ५३ मध्ये उभी आहे. त्यामुळे राठोड गेले कुठे? असा सवाल केला जात आहे. दरम्यान, येत्या २४ तासात राठोड आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पूजा चव्हाण या तरुणीने रविवारी (७ फेब्रुवारी) आत्महत्या केली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्याच्या कथित संभाषणाच्या ११ क्लिप व्हायरल झाल्या. त्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेत, मंत्री राठोड यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरली आहे. शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने याप्रकरणी अद्याप भूमिका मांडली नाही. त्यामुळे याप्रकरणाचे गूढ वाढले असतानाच आता राठोड यांची (MH 01DP 7585) गाडी मंत्रालयाच्या पार्किंगमध्ये उभी असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही गाडी उभी असल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
काय प्रकरण
मूळची परळी येथील २२ वर्षीय पूजा चव्हाण शिक्षणाच्या निमित्ताने पुण्याला आली होती. ती आपला चुलत भाऊ आणि त्याच्या एका मित्रासोबत महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीमध्ये राहात होती. याच सोसायटीत तीने आत्महत्या केली. राज्यमंत्री संजय राठोड आणि पुजाचे समाज माध्यमातून छायाचित्रे, ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहेत. त्यामुळे तिच्या आत्महत्या प्रकरणाची सुई राठोड यांच्यावर आपोआप रोखली गेली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही
यवतमाळमध्ये शुकशुकाट
राठोड हे यवतमाळमध्ये राहतात. यवतमाळमध्ये त्यांचा प्रशस्त बंगला आहे. हा बंगला नेहमी गजबलेला असतो. बंगल्यात सतत कार्यकर्त्यांची वर्दळ असते. पण पूजा चव्हाण प्रकरण मीडियात आल्यापासून या बंगल्यातील वर्दळ अचानक गायब झाली असून बंगल्यात शुकशुकाट पसरला आहे.