मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन जवळ आला आहे. या दिवशी लाखो अनुयायी मुंबईत येतात. मुंबईत आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. यामुळे आंबेडकरी अनुयायांनी यावर्षी मुंबईत चैत्यभूमी येथे व दसऱ्यालाही नागपूर दिक्षाभूमी परिसरात येऊन गर्दी करू नये, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. आंबेडकरी अनुयायांना यावर्षी चैत्यभूमी, दिक्षाभूमीचे ऑनलाइन दर्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना आठवले यांनी केले आहे.
मुंबईत आणि राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सरकारने केलेल्या आवाहनानुसार 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची व बुद्ध जयंती घरातच साजरी केली. इतर समाजातील लोकांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला. सध्या चैत्यभूमी असलेल्या दादर परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी मुंबईत येऊन कोरोनाला सोबत घेऊन जाऊ नये. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून घरात राहूनच महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन आठवले यांनी केले आहे. दसऱ्याला धम्म चक्र प्रवर्तन दिनी नागपूर दिक्षाभूमी येथेही लाखो अनुयायी एकत्र येतात. दिक्षाभूमी येथेही अनुयायांनी गर्दी करू नये, असे आवाहन आठवले यांनी केले आहे.
ऑनलाइन दर्शन -
6 डिसेंबरला आणि दसऱ्याला देशभरातून लाखो अनुयायी मुंबईत दादर चैत्यभूमी, तर नागपूर येथे दिक्षाभूमीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. या लाखो अनुयायांना चैत्यभूमी आणि दिक्षाभूमीचे ऑनलाइन दर्शन घेता यावे यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आठवले यांनी केल्या आहेत.