मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik Arrest) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी कोठडी सुनावली आहे. अशातच मागील शुक्रवारी पोटात दुखत असल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Hospital Discharged Nawab Malik) देण्यात आला आहे. त्यानंतर मलिक यांना ईडी कार्यालयात आणण्यात आले. आजपासून पुन्हा ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी सुरू होणार आहे.
3 मार्चपर्यंत मलिक ईडीच्या कोठडीत -
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरकडून कुर्ला येथील जमीन खरेदी केल्याप्रकरणी नवाब मलिक यांना आठ तास चौकशीनंतर ईडीने अटक केली होती. हसीना पारकरसोबत झालेल्या जमीन खरेदी विक्री प्रकरणात ईडीने मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांचा मुलगा फराज याला देखील ईडीने समन्स पाठवले असून चौकशीकरिता बोलवण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
दाऊद इब्राहिमच्या बहिणीला कुर्ला येथे मालमत्ता बळकावण्यासाठी मदत करणे आणि नंतर ती खरेदी करणे या आरोपाखाली मलिक यांना बुधवारी ईडीकडून अटक करण्यात आली होती. यातील पैसा हवालामार्फत टेरर फंडिंगसाठी वापरण्यात आल्याचा आरोप ईडीने ठेवला आहे. मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश पीएमएलए कोर्टाने दिले होते. शुक्रवारी मलिक यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी त्यांना जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे जेजे मध्येच ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.
मलिक यांच्या मुलाला ईडीचा समन्स -
दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याकडून कुर्ला येथील मालमत्ता मलिक यांनी बेकायदेशीरपणे खरेदी केली. या खरेदीमध्ये त्यांचा मुलगा फराज हा सहभागी होता. कागदपत्रे आणि पैशांची व्यवस्था करण्यात फराजने पुढाकार घेतला होता, असा आरोप ईडीने ठेवला आहे. या संदर्भातच त्याला चौकशीसाठी बोलावले आहे.
तत्पूर्वी मलिक यांचा भाऊ कप्तान हा इक्बाल याच्यासोबत काम करत असलेल्या अहमदुल्ला अन्सारी याची जबानी ईडीने घेतली. अन्सारी आणि फराज यांनी दक्षिण मुंबईतील हसीना पारकर असोसिएट्सच्या कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी फराज याने 50 लाखांची रोख रक्कम आणि 5 लाख रुपयांचा चेक हसीना पारकर हिच्या हातात दिला होता. यावेळी हसीना पारकरचा निकटवर्तीय सलीम पटेल उपस्थित होता, असे ईडीचे म्हणणे आहे.