मुंबई -महाविकास आघाडी सरकारने या 'टीआरपी' घोटाळ्याची चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मत व्यक्त केले आहे. टीआरपी घोटाळयानंतर तथाकथित पत्रकाराचे संभाषण समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रसारमाध्यमांना लोकशाही व्यवस्थेचा चौथा स्तंभ मानण्यात आले आहे. मात्र प्रसारमाध्यमांतील एक तथाकथित पत्रकार व्यक्ती देशाच्या पंतप्रधानांचे कार्यालय व प्रमुख मंत्रालयांना अक्षरशः खेळण्याप्रमाणे वापरून घेत आहे. हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून समजते, असेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-'लोकशाहीचा चौथा स्तंभ कमजोर करण्याचे कारस्थान; टीआरपी घोटाळ्यातून भाजपचे पितळ उघडे'
याव्यक्तीला देशातील सैनिकांचे बलिदान एक ‘विजयाचा’ क्षण वाटतो आहे. प्रसिद्ध झालेली ही सर्व माहिती वाचल्यावर खरे देशद्रोही कोण आहेत हे जनतेला कळेल. हा इसम अत्यंत बिनधास्तपणे न्यायाधीशांना विकत घेण्याच्या गप्पा मारताना अत्यंत स्पष्टपणे दिसत आहे. न्यायालयाचा खऱ्या अर्थाने अवमान आहे, असा आरोपही मंत्री पाटील यांनी केला आहे. अनेक गोपनीय बातम्या देशाच्या संसदेला आणि अगदी देशाच्या मंत्रीमंडळाला अवगत होण्यापूर्वीच या व्यक्तीला माहिती होत्या, असेही जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
हेही वाचा-टीआरपी घोटाळा: सहाव्या आरोपीला मुंबई पोलिसांकडून अटक
काँग्रेसनेही केली आहे टीआरपीवर घोटाळ्यावर टीका
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही नुकतेच टीआरपी घोटाळ्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुंबई पोलिसांनी उघड केलेल्या टीआरपी घोटाळ्याने लोकशाही विरोधातील कट उघडकीस आला आहे. यातून लोकशाही किती संकटात आहे ते स्पष्ट झाले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ कमजोर करण्याचे हे कारस्थान आहे. फ्रॉड पद्धतीने टीआरपी वाढवल्याचे दाखवून केलेला हा आर्थिक घोटाळा तर आहेच, परंतु भाजपच्या षडयंत्राचाही तो एक भाग आहे, अशी घणाघाती टीका करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबई पोलिसांनी उघड केलेला हा घोटाळा लोकशाहीच्या हितासाठी असून, आम्ही त्याचे स्वागत करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
काय आहे टीआरपी घोटाळा ?
मुंबई पोलिसांकडून चलचित्र वाहिन्यांच्या (टीव्ही चॅनल्स) टीआरपी घोटाळ्याचा एक मोठा खुलासा करण्यात आलेला आहे. आपल्या चॅनेलचा टीआरपी जास्त यावा यासाठी काही चॅनल्स संबंधितांना पैसे देऊन दिवसभर टीव्ही सुरू ठेवत ते चॅनल लावण्यास सांगत होते. हे रॅकेट देशासह विदेशातही अस्तित्वात असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली होती.
पार्थो दासगुप्तांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
टीआरपी घोटाळ्यामध्ये अटक झालेल्या पार्थो दासगुप्तांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. पार्थो दासगुप्तांचे वृत्तवाहिनीचे संचालक अर्णब गोस्वामी यांच्यासोबत घनिष्ठ संबंध असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.