मुंबई - लॉकडाऊन कालावधीत ग्राहकांना देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलाबाबत भाजपला आज जागी आली, अशी टीका अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर केली आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यावर जून महिन्यात वाढीव वीजबिल आल्यावर त्यावर संपूर्ण महाराष्ट्राचा मी एक अहवाल तयार केला. त्यानंतर मुंबईत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व सर्व वीज वितरण कंपन्याची बैठक घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत व वीज वितरण कंपन्यांचे अधिकारी यांची बैठक घेतली. त्यातून ग्राहकांना वीज बिलात सवलत देण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच तो मंत्रिमंडळासमोर आणला जाईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. वाढीव बिलाबाबत किरीट सोमय्या इतके दिवस झोपले होते का असा सवालही परब यांनी केला.
प्रताप सरनाईक यांनी आर्किटेक्ट अन्वेष नाईक आत्महत्येचा तपास पुन्हा करण्याची मागणी गृहमंत्री व राज्य शासनाकडे केली आहे. त्या संपूर्ण प्रकरणाचा बारकाईने अभ्यास केला जाईल. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यात काय झाले, नेमक्या काय त्रुटी राहिल्या या सर्वांचा योग्य तो अभ्यास करून राज्य सरकार कायदेशीर प्रक्रिया करून पुढची कारवाई करेल, असे परब यांनी सांगितले.