मुंबई - मशिदींवरील भोंग्यावरुन तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत संताप व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. यावरुन मंत्री अनिल परब यांनी मनसेला सडेतोड उत्तर दिले आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे, आंदोलन करताना दोन दिवस आत जायची तयारी ठेवावी लागते. ती तयारी ठेवूनच आम्ही आंदोलने केली, असा टोला परब यांनी राज ठाकरेंना लगावला.
मनसे आणि शिवसेना यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप
मशिदींवरील भोंग्यांवरून सध्या राज्यातील राजकारण तापले असताना दुसरीकडे मनसे आणि शिवसेना यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहिले. तसेच सत्तेचा ताम्रपट कुणाच्याही हाती नसतो. उद्धव ठाकरे, तुमच्याही हातात नाही. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. राज ठाकरेंच्या पत्राविषयी मंत्री अनिल परब यांना प्रसारमाध्यमांनी छेडले असता, त्यांनी मनसेवर जोरदार टीका केली.
आंदोलन केले तर त्यांच्यावर कारवाई होणारच
कोणतेही आंदोलन केले तर आंदोलकांवर कारवाई होणारच. फक्त ती वेगवेगऴ्या स्वरूपाची असते. आंदोलनात सहभागी झाल्यानंतर आतमध्ये जायची तयारी ठेवा, असे दिवंगत बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. त्यामुळे आंदोलकांवर कारवाई होणार. हे काही नवीन नाही. पोलीस अतिरेक्यांना शोधण्याचे काम करत असतात तसेच आंदोलकांना शोधण्याचे काम करतात. आम्ही देखील यापूर्वी आंदोलने केली आहेत. आमच्या घरात देखील रात्री-अपरात्री पोलीस येऊन आम्हाला घेऊन जायचे. कधीकधी मारत मारत देखील घेऊन गेले आहेत. आंदोलकाला या सगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागते. हा पोलीस आणि आंदोलकांचा विषय असतो. यात सरकारचा काही विषय नसतो. पोलीस शिवसेनेचे सरकार आहे म्हणून कारवाई करतात आणि काँग्रेस किंवा भाजपाच्या काळात करत नव्हते, अशातला भाग नाही. ते आंदोलकांना शोधायला कधीही जातात. कुठल्याही प्रकारच्या आंदोलनात एखादा गुन्हा घडतो, तेव्हा पोलीस त्यांची कारवाई करत असतात, असे अनिल परब यांनी सांगत मनसेवर तोंडसुख घेतले.