मुंबई - राज्यात सध्या हनुमान चालीसा आणि भोंग्यावरुन राजकारण तापले असताना हॉस्पिटलच्या दारात जी प्रार्थना होते तीच खरी प्रार्थना आहे, असा टोला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे. डॉक्टर हेच खरे देव आहेत. देव कसा आहे, हे डॉक्टरांच्या माध्यमातून पाहायला मिळाले, असे गौरवोद्गार आदित्य ठाकरे यांनी काढले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन इमारत विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय परिसरात बांधण्यात आली आहे. या नवीन इमारतीचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
'डॉक्टरांकडून डोक्यावर बर्फ ठेवून काम करायला शिकलो' : कोरोना काळात मुंबई महापालिकेने, डॉक्टरांनी चांगले काम केले. मुंबईत राबवलेल्या मुंबई मॉडेलची जगभरात चर्चा होते. कोविडचा सर्वाना कंटाळा आला, मात्र डॉक्टर आजही काम करत आहेत. कोरोना काळात प्रचंड दबावाखाली डॉक्टर काम करत आहेत. त्यावेळी ते डोक्यावर बर्फ ठेवून काम करत होते. राजकारणात डोक्यावर बर्फ ठेवून काम करावे लागते. डॉक्टरांकडून डोक्यावर बर्फ ठेवून काम कसे करायचे हे शिकलो, असे ठाकरे म्हणाले.
'मास्क माझ्याच तोंडावर' : आजच्या कार्यक्रमात माझ्याच चेहऱ्यावर मास्क दिसतो आहे. इतर कोणाच्या तोंडावर मास्क लावलेला नाही याबाबत आदित्य ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त केले. मुंबईत गेले काही दिवस राजकीय डेसीबल वाढले आहे. आंदोलन सुरू आहेत, पण आम्ही मास्क नसल्याची आठवण करून देत होतो, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. ६३६ खाटांचे कूपर रुग्णालय आहे. या रुग्णालयात मुंबई उपनगरातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. या महाविद्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण आज करण्यात आले. या महाविद्यालयात वर्षाला २०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या महाविद्यालयामुळे दरवर्षी २०० नवीन डॉक्टर तयार करणे शक्य झाले आहे. ४० महिन्यात ही इमारत उभी करण्यात आली आहे.