मुंबई - अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे पुढील तीन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमवार, मंगळवार, आणि बुधवार असा त्यांचा हा दौरा आहे. याचवेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार हे सुद्धा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार आहेत.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सत्तार हे सकाळी जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देणार आहेत. त्यानंतर बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील पांढरवाडी, पाडळसिंगी व पाचेगाव येथील नुकसानग्रस्त भागांची ते पाहणी करतील आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी बीड जिल्ह्यातील कुर्ला, शिवनी व पाली या भागांचा दौरा करणार आहेत. त्यानंतर ते 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' आणि महाराजस्व अभियानाची आढावा बैठक देखील घेणार आहेत.
मंगळवारी सत्तार हे उस्मानाबाद जिल्ह्यातील सिलवडी व सुरडी या नुकसानग्रस्त भागांची पहाणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतील. तर, बुधवारी दिवसभर ते लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.