मुंबई - सध्या काश्मीरची परिस्थिती खूप वाईट आहे. या वाईट परिस्थितीबाबत आम्ही चिंताही व्यक्त केली आहे. मात्र, काश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत, असे वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aaditya Thackeray ) यांनी केला आहे. सध्या काश्मीरबाबतचे चित्र डोळ्यासमोर उभे केले जात आहे ते योग्य नाही, असा चिमटाही आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला काढला आहे. पर्यावरण दिनानिमित्त "माझी वसुंधरा" कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी काश्मीरबाबत ही चिंता व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काश्मीरबाबत चिंता व्यक्त केली होती. काश्मिरी पंडितांसाठी जे शक्य आहे ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्याकडून देण्यात आले आहे. शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली. पण, घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले आहे, ही धक्कादायक व अस्वस्थ करणारी घटना आहे. या कठीण काळात काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.