मुंबई - माहीम येथील मच्छिमार कॉलनी परिसरात अरुणकुमार वैद्य मार्गावर ५७ इंच व्यासाची मुख्य जलवाहिनी शनिवारी फूटली. यामुळे जी दक्षिण आणि जी उत्तर विभाग अंतर्गत येणाऱ्या माहिम (पश्चिम), माटुंगा (पश्चिम), दादर (पश्चिम), प्रभादेवी या परिसरामधील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तसेच लाखो लिटर पाणी वायाला गेले आहे.
जलवाहिनी फुटल्याने शनिवारी दुपारी ४ ते सायंकाळी ७ या कालावधीत दादर, प्रभादेवी, एलफिन्स्टन या परिसरांमध्ये पाणीपुरवठा खंडित झाला. तसेच, शिवाजी पार्क, माहिम येथे देखील सायंकाळी ७ ते रात्री १० या कालावधीतील पाणीपुरवठा करणे शक्य झालेले नाही. फुटलेल्या जलवाहिनीच्या गळतीचे नेमके ठिकाण शोधून दुरुस्ती करण्याचे काम सुरू असून, नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी केले आहे.