मुंबई - म्हाडाने मिश्रा मेंशन इमारतीच्या पुनर्विकासाचे काम दिलेल्या बिल्डरला दणका दिला आहे. या बिल्डरला पुनर्विकासासाठी दिलेला ना हरकत परवाना (एनओसी) काढून घेतला आहे. मिश्रा मेंशन इमारतीची दुर्घटना घडल्याने ही कारवाई म्हाडाने केली आहे.
दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरातील मिश्रा मेंशन इमारतीचा भाग 27 ऑगस्टला कोसळला होता. या दुर्घटेत दोन जणांचा बळी गेला होता. याप्रकरणी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने कारवाई केली आहे. त्यानुसार या इमारतीच्या पुनर्विकासाची एनओसी अर्थात ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. बिल्डरकडून हा प्रकल्प काढून घेतल्याची माहिती दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे यांनी 'ईटीव्ही भारत'ला आज दिली आहे.
बिल्डरविरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल
नागपाडा, शुक्लाजी रोड, येथे मिश्रा मेंशन आणि अब्दुल रेहमान या दोन इमारती आहेत. या दोन्ही उपकरप्राप्त इमारतीचा एकत्रित पुनर्विकास सिरसीवाला बिल्डरला देण्यात आला होता. तर यासाठी दुरुस्ती मंडळाने 2017 मध्ये ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते. या दोन्ही इमारतीत एकूण 111 रहिवासी राहत होते. ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर ही इमारतीचे बांधकाम होत नव्हते. त्यामुळे मंडळाकडून अनेकदा पत्र पाठवण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही काम काही सुरू झालेच नाही. याबाबतच्या तक्रारीनंतर मंडळाने बिल्डरला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. 2019मध्ये ही नोटीस पाठवण्यात आली होती, असे डोंगरे यांनी माहिती दिली आहे. त्यानंतर काम झाले नसताना 27 ऑगस्टला इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेप्रकरणी बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली होती.
लवकरच रहिवाशांची बैठक-
बिल्डरला देण्यात आलेली एनओसी दोन दिवसांपूर्वी रद्द केल्याची माहिती अरुण डोंगरे यांनी दिली. तर पुनर्विकासासाठी नवीन बिल्डरची नियुक्ती करायची अथवा पुढे काय करायचे यासाठी लवकरच रहिवाशांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. याबाबत नेमका काय निर्णय होईल, याकडे रहिवाशांचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, बिल्डरविरोधात आणखी कडक कारवाई होण्याची गरज व्यक्त होत आहे.