मुंबई- राज्यात कोरोना, ओमायक्रॉनचे रुग्ण संख्या झपाट्याने ( Omicron cases increasing in Maharashtra ) वाढत असताना नेहमी ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न समोर आला आहे. अशा परिस्थितीत गृह विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 50 ते 60 वयोगटातील व गंभीर आजार असलेल्या मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम काम करण्याची ( Work from home for Maharashtra Police ) परवानगी देण्यात आली आहे.
लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मुंबई पोलिसांनादेखील कोरोनाची लागण होत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पोलिसांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे गृह विभागाने 50 ते 60 वयोगटातील व गंभीर आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम काम करू देण्याची परवानगी देण्यात यावी, असे आदेश पोलीस महानिरीक्षक एम. रामकुमार ( Director General of Police order ) यांनी दिले आहेत.
हेही वाचा-'Bulli Bai' app case : बुली बाई प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत; दिल्ली पोलिसांची कारवाई
24 तासांत 70 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
मुंबईत तब्बल 24 तासांत 70 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 3 दिवसांपासून राज्यातील कोरोनाची चिंताजनक आकडेवारी समोर येत आहे. यात अनेक नेत्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहेत. यातच राज्यातील सर्वाधिक पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी 50 ते 60 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करा, असे आदेश दिले आहेत. तसेच यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी ( Work from home for Police in Maharashtra ) करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्यांना नियमांचे पालन करावे लागेल, असेही सांगण्यात आले आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मागील वर्षाप्रमाणे यंदाही आरोग्य व्यवस्था
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, की कोरोनाच्या काळातील निर्बंध कडक करण्यासंदर्भातील निर्णय बुधवारी झालेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत आरोग्य मंत्रीदेखील उपस्थित होते. ते एकत्रितपणे सर्व निर्णय घेतील. तसेच कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मागील वर्षाप्रमाणे यंदाही आरोग्य व्यवस्था सुसज्ज करण्यात आली आहे. पोलिसांमधील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता राज्यात ५५ वर्षांवरील पोलिस कर्मचाऱ्यांना कमी महत्वाचे काम देण्याचा निर्णय या पूर्वीच घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. राज्यसरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत. यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. ते लवकरच ते कळवण्यात येतील, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.