मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर रविवारी १४ नोव्हेंबर २०२१ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी अप व डाउन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व विद्याविहार दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५पर्यंत मेगाब्लॉग असणार आहे. या कालावधीत सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या धिम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील तसेच या सेवा भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला या स्थानकांवर थांबतील व त्यानंतर नियोजित मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील. तर घाटकोपर येथून सकाळी १०.४० ते दुपारी ३.५२पर्यंत सुटणाऱ्या अप-धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील तसेच या सेवा कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१०पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा व पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱया अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व कुर्लादरम्यान तसेच पनवेल आणि वाशीदरम्यान विशेष सेवा चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ४.३० या वेळेत मेन लाइन आणि ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.