मुंबई - दिशा सॅलियन यांच्या आई-वडिलांनी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली. मुंबईतील त्यांच्या कार्यालयात ही भेट झाली.
भेटीदरम्यान त्यांनी आपल्या मुलीच्या मृत्यू पश्चात होणारी बदनामी ही त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना समाजात सन्मानाने जगता येत नसल्याचे देखील त्यांनी नमूद केले व तिच्या मृत्यूबद्दल प्रसार माध्यमातून खोटी माहिती जाहीर करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व इतर सर्व संबंधितांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी आयोगाकडे केली आहे. या मागणीची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे व याबाबत सालियान कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.