मुंबई - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील संसद सदस्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, जयंत पाटील, सुभाष देसाई, मुख्य सचिव संजय कुमारया बैठकीला उपस्थित होते. बैठकीला राज्यातील लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मोठ्या संख्येने हजर होते. तर भाजप खासदार नारायण राणे गैरहजर असल्याचे समजते.
या मुद्द्यावर चर्चा -
कोरोना काळात राज्याला केंद्र सरकारकडून कमी प्रमाणात निधी मिळाला आहे. केंद्र सरकारकडून राज्याला ३६ हजार कोटीहून अधिक निधी येणे बाकी असून त्यापैकी काही कोटी निधी देण्यात आलेला आहे. हा निधी राज्याला मिळावा यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी प्रयत्न करावेत अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केली आहे. मुंबईमधील मेट्रो कारशेडचा वाद सुरू आहे. हा वाद मिटवण्यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत. मेट्रो कारशेडचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी केंद्र सरकारकडून कांजूरच्या जागेवर केलेला दावा मागे घेण्याबाबत सूचना करावी, असे खासदारांना सांगण्यात आले आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात केंद्राने योग्य बाजू मांडण्याची विनंती खासदारांनी करावी आदी सूचना मुख्यमंत्र्यांनी खासदारांना केली आहे.