मुंबई - मोहित कंबोज यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Minorities Minister Nawab Malik ) यांच्याविरोधात माझगाव न्यायालयात मानहानीचा याचिका दाखल केला होता. याप्रकरणी आज माझगाव न्यायालयात सुनावणी पार पडली आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक ( NCP leader Nawab Malik ) यांचा १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर माझगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शिवाय मलिक यांना ५ हजार रुपये अनामत जमा करण्याचे आदेश देखील दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी ३० डिसेंबरला होणार आहे.
मलिक म्हणाले -
यावेळी "मी कोणाचाही अनादर केलेला नाही, मोहित कंबोज यांच्यावर केलेल्या प्रत्येक आरोपाचे पुरावे माझ्याकडे असून, हे सर्व पुरावे आपण कोर्टात सादर करू. मोहित कंबोज यांनी बँकेच्या व्यवहारात अपहार करून अकराशे कोटींची अफरातफर केली आहे. याबाबत आपल्याजवळ पुरावे आहेत. बँकेत केलेल्या अफरातफरीचे प्रकरण समोर आल्यानंतर मोहित कंबोज यांनी आपले नाव बदलू मोहित भारतीय ठेवले" असा आरोप पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी केला आहे.
पुढील सुनावणी 30 रोजी -
मोहित कंबोज यांच्या मानहानीच्या खटल्यात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे कोर्टात दाखल झाले होते. यावेळी माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने त्यांचा जामिन मंजूर केला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी ही 30 डिसेंबर रोजी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
दरम्यान ३ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झालेल्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणासंदर्भात नवाब मलिक सातत्याने अनेक खुलासे करताना दिसले. त्यादरम्यान मलिकांनी आर्यन खानला अटक नाही तर त्यांचे अपहरण करून खंडणी मागण्यात आली आणि या कटकारस्थानाचा मुख्य सुत्रधार मोहित भारतीय असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे याप्रकरणी मोहित भारतीय यांनी नवाब मलिकांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.
हेही वाचा - Parambir Singh : फरार आदेशाविरोधातील परमबीर सिंगांच्या याचिकेवर आज सुनावणी