मुंबई - महानगरपालिकेच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्याचा भाग म्हणून असेच तब्बल २४ किलो वजनाचे 'श्रीयंत्र' मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्यावतीने महानगरपालिकेला मुंबादेवीच्या साक्षीने अर्पण करण्यात येणार आहे. हे श्रीयंत्र महानगरपालिकेच्या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.
२४ किलो वजनाचे 'श्रीयंत्र'
भारतीय परंपरा व आस्था यामध्ये अनेक वैविध्यपूर्ण पैलू आहेत. यामध्येच एक पैलू आहे, तो म्हणजे धार्मिक–अध्यात्मिक साधनेत महत्त्वाचे मानले जाणाऱ्या श्री यंत्रांचा! धार्मिक व अध्यात्मिक परंपरेनुसार या श्रीयंत्रांमुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. अशी अनेकांची आस्था व श्रद्धा असते. महानगरपालिकेच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्याचा भाग म्हणून असेच तब्बल २४ किलो वजनाचे 'श्रीयंत्र' मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्यावतीने महानगरपालिकेला येत्या सोमवारी दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबादेवीच्या साक्षीने अर्पण करण्यात येणार आहे.
संग्रहालयात ठेवण्यात येणार -
मुंबादेवी मंदिरात हा कार्यक्रम झाल्यानंतर हे श्रीयंत्र महानगरपालिकेच्या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. महानगरपालिकेला अर्पण करण्यात येणारे हे श्रीयंत्र संतोष येरकल्लू यांनी तयार केले आहे. पंचधातूपासून तयार करण्यात आलेले हे श्रीयंत्र २४ किलो वजनाचे आहे. पंचधातूच्या या श्रीयंत्राला सुवर्ण मुलामा देखील देण्यात आला आहे. या श्रीयंत्राचा व्यास हा ९ इंचाचा असून, तो नवग्रहांचे प्रतीक मानला जातो. तर श्रीयंत्राची उंची ही १२ इंच असून, ती १२ राशींचे प्रतीक मानली जाते.
हेही वाचा - ७ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ईडीकडून अटक.. न्यायालयाकडून ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी..