मुंबई - विमान प्रवास करून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन करण्याचा नियम आहे. हा नियम हा सर्वांना सारखा असल्याने त्याचे पालन करावेच लागेल. या नियमातून कोणत्या अधिकाऱ्यांना सूट हवी असेल तर त्यांनी पालिकेला लेखी कळवायालाच हवे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
मुंबईत सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आलेले बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना महापालिकेने क्वारंटाईन केले होते. त्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावर मुंबईत विमान मार्गाने येणाऱ्या प्रत्येकाला क्वारंटाईन केले जाईल, ज्या अधिकाऱ्यांना क्वारंटाईनमधून सूट हवी आहे, त्यांनी पालिकेला लेखी कळवावे, असे आदेश काढण्यात आले आहेत. त्यावर महापौर बोलत होत्या.
जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर, केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमांचे मुंबई महापालिका पालन करत आहे. हा नियम विमानाने येणाऱ्या सर्वाना लागू आहे. ज्या अधिकाऱ्यांना महत्त्वाचे काम असेल त्यांनी पालिकेला लेखी कळवावेच लागेल. जर पालिकेला कळवले नसले तर त्या अधिकाऱ्यांना नियमाप्रमाणे १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावेच लागेल, असे महापौरांनी म्हटले आहे.
सिने अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यास आलेल्या बिहारच्या आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वारंटाईन केले होते. या प्रकरणी राजकीय आणि प्रशासकीय वाद निर्माण झाला होता. राज्य सरकारच्या २५ मेच्या गाईडलाईनप्रमाणे तिवारी यांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे मोठा वाद झाल्याने पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी क्वारंटाईनबाबत आदेश काढले आहेत. यात काही अधिकारी क्वारंटाईनमधून सूट मिळवण्यासाठी पदाचा गैरवापर करत असल्याचे निदर्शनास आल्याचे म्हटले आहे.
ज्या अधिकाऱ्याला मुंबईत कामानिमित्त यायचे असेल त्यांना मुंबई महापालिकेला दोन दिवस आधी लेखी कळवावे लागणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेले कामाचे कारण योग्य वाटले, तरच यापुढे क्वारंटाईनमधून सूट दिली जाणार आहे. अन्यथा त्या अधिकाऱ्यांना तसेच प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल असे म्हटले आहे.