मुंबई - मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. जुलै ऑगस्टपासून कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत होती. गेल्या महिनाभरात ९०० ते १२०० रुग्ण रोज आढळून येत होते. त्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून वाढ पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवादरम्यान सोशल डिस्टनसिंग, मास्क घालणे आदी नियमांकडे दुर्लक्ष केल्याने रुग्णांच्या संख्येत अधिकच वाढ झाली आहे. ही वाढ आणखी आठ ते दहा दिवस दिसून येईल, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईत पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या चांगलीच नियंत्रणात आली आहे. मुंबईत ५ सप्टेंबरपर्यंत एकूण १ लाख ५३ हजार ७१२ रुग्ण नोंदवले गेले असले तरी यातील १ लाख २२ हजार ५६७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे मुंबईत आता २२ हजार ९७५ सक्रिय रुग्ण आहेत. यातील ८० टक्क्यांहून जास्त रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तेदेखील लवकरच कोरोनामुक्त होतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र गणेशोत्सव काळात कोरोना रोखण्यासाठी आवश्यक असणारी खबरदारी नागरिकांनी घेतली नसल्याने बाधितांशी निकट संपर्क वाढल्याने पुन्हा किमान आठ दिवस रुग्णसंख्या जास्त नोंदवली जाण्याची शक्यता पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांवर गेले असून दुपटीचा कालावधी ७३ दिवस झाला आहे.
रुग्ण वाढले तरी पालिका सज्ज -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा होणार असल्याने गर्दी टाळण्यासाठी कठोर नियम घालून देण्यात आले होते. तरीदेखील आवश्यक प्रमाणात खबरदारी घेतली गेली नसल्याने निकट संपर्क वाढल्याने रुग्णवाढ होत आहे. यातच लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर काळजी घेतली गेली नसल्याने रुग्णवाढीची शक्यता आहे. यातच मुंबईत दररोज सहा हजार कोरोना चाचण्यांची संख्या आता दहा हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण जास्त आढळतील अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. रुग्ण वाढले तरी पालिकेची संपूर्ण यंत्रणा सक्षम असल्याचेही काकाणी म्हणाले. विशेष म्हणजे सध्या सहा हजार बेड क्षमता असणाऱ्या जम्बो कोविड सेंटरमध्ये ५० टक्के खाटा रिक्त असल्याची माहितीही त्यांनी दिली.
अशी झाली वाढ -
मुंबईत २३ ऑगस्ट रोजी ९३१, २४ ऑगस्ट रोजी - ७४३ आणि २५ ऑगस्ट रोजी फक्त ५८७ रुग्ण नोंदवले गेले. मात्र २७ ऑगस्ट - १३५०, २८ ऑगस्ट - १२१७, २९ ऑगस्ट - १४३२, ३० ऑगस्ट - १२३७ तर ३१ ऑगस्ट रोजी ११७९ रुग्ण नोंदवले गेले. तर १ सप्टेंबर रोजी ११४२, २ सप्टेंबर रोजी - १६२२, ३ सप्टेंबर रोजी - १५२६, ४ सप्टेंबर रोजी १९२० तर ५ सप्टेंबर रोजी १७३५ इतकी रुग्णसंख्या नोंदवली गेली.