मुंबई - राज्य सरकारने सर्व दुकाने आणि आस्थापनेवरील नामफलक मराठीत करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी पालिकेकडून केली जात असून मुंबईतील दुकानांवरील नामफलक मराठीत करण्यासाठी पालिकेने 31 मे ची डेडलाईन दिली आहे. डेडलाईनपर्यंत नामफलक मराठीत न करणाऱ्या दुकानदारांवर पालिकेकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
मराठी नामफलक बंधनकारक - मुंबईतील दुकानांच्या पाट्या मराठीत असणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुधारित अधिनियम, २०२२ कलम ३६ क (१) व (२) नुसार “सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मुंबईतील अनेक दुकानांवरील पाट्या मराठीत नसल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात घेऊन दुकाने, आस्थापनांवरील पाट्या मराठीत करण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. शिवाय ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशी आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तिंची किंवा गड किल्ल्यांची नावे लिहीली जाऊ नयेत अशी तरतूद सदर अधिनियमात करण्यात आली आहे.
अन्यथा होणार कारवाई - मराठी नामफलक लावण्याबाबत विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तसेच गर्दीच्या ठिकाणी नामफलकाच्या दृष्टीने जनजागृती होण्यासाठी सर्व विभागीय सहाय्यक आयुक्तांना फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच विभागीय कार्यालयातील व्यापारी संघटनांचे सदस्य तसेच आस्थापनांचे मालकांसोबत बैठक घेऊन अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ३१ मे पूर्वी दुकानांवरील पाट्या नियमानुसार सुधारित करून घ्याव्यात अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत. याची अंमलबजावणी होते की नाही, याकडे पालिका लक्ष ठेवणार असून नियमाचे उल्लंघन करणा-यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.