मुंबई - दिवाळीनिमित्त शहरातील फुलांच्या बाजारपेठेत फुले खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. तर दुसरीकडे राज्यातील फुल उत्पादक शेतकरी फुलाचे दर पावसामुळे घसरल्याने हवालदिल झाला आहे. फुलांचे भाव घसरल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. सणासुदीत पूजेसाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. रविवारी लक्ष्मीपूजन असल्यामुळे बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची मागणी वाढली आहे. झेंडूच्या फुलांचे भाव 100 रुपये किलोपर्यंत पोहचले आहे. फुलांच्या मागणीत वाढ झाल्याने हे दर वाढल्याचे फुले विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - चेंबूरच्या शालेय मुलांनी दिवाळी सुट्टीत गड किल्ले बनवून घालवला वेळ
ऐन सणासुदीच्या दिवसात फुलांचा भाव घसरल्याने शेतकऱ्यांवर मात्र अक्षरशः फुले फेकून देण्याची वेळ आली आहे. राज्यात सध्या सर्वत्र अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे फुलांच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. झाडांवरच ओली झालेली फुले बाजारात येईपर्यंत खराब व्हायला लागली आहेत. या फुलांना 5 रुपये किलोच्या वर दर मिळत नसून यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. फुल उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने त्यांना रस्त्यावर फेकणे योग्य असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी राजाकडून उमटत आहे.