मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात याचिका दाखल करणाऱ्या वकील जयश्री पाटील यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. काही मराठा संघटनांकडून आपल्याला धमकीचे कॉल्स येत असल्याची माहिती त्यांनी राज्यपालांना दिली.
मी झुकणार नाही
जयश्री पाटील यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे, काही मराठा संघटना अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कारवाई केल्यामुळे जयश्री पाटील यांना धमक्या देत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने जयश्री पाटील यांच्या रिट पिटीशनवर आपला आदेश सुनावल्यानंतर अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यामुळे आपल्याला आता लक्ष्य केलं जात असल्याचं जयश्री पाटील यांचं म्हणणं आहे. मात्र "कितीही दबाव आणला तरी पण मी कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही. भले जसे दत्ता सामंत आणि बुखारी यांना संपवण्यात आलं, तसं मलाही संपवण्यात आलं तरी मी गप्प बसणार नाही" असे जयश्री पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
मराठा आरक्षणाविरोधातही पाटील यांची याचिका
अॅडव्होकेट जयश्री पाटील यांचं नाव यापूर्वी मराठा आरक्षण प्रकरणीदेखील चांगलंच चर्चेत आलं होतं. त्या स्वतः मराठा समाजातल्या आहेत. तरीही मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी जयश्री पाटील यांच्या माध्यमातून दाखल केली होती. मराठा आरक्षणाला या याचिकेच्या माध्यमातून जयश्री पाटील यांनी विरोध केला आहे. हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टातही त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात बाजू मांडली आहे.
कोण आहेत जयश्री पाटील?
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. एल के पाटील यांच्या जयश्री पाटील या कन्या आहेत. मानवाधिकारांबाबत त्यांचं काम असून त्यांनी या विषयावर अनेक पुस्तकंही लिहिली आहेत. तसंच मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी भूमिका बजावलेली आहे. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत मराठा आरक्षणाला विरोध दर्शविला आहे.
हेही वाचा - डॉ. जयश्री पाटील यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुख प्रकरणात 'कॅव्हेट' दाखल