ठाणे - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक मनसुख हिरेनचा मृतदेह ठाण्याजवळील मुंब्रा खाडीत सापडला आहे. हिरेन यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन हे कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात करण्यात आले असून, शवविच्छेदनाचा अहवाल राखून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शुक्रवारी फॉरेन्सिक लॅब टीमच्या देखरेखीखाली करण्यात आले. मात्र शवविच्छेदन अहवाल राखून ठेवण्यात आला आहे. अहवाल मिळताच याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना कळवण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली आहे. दरम्यान शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच हिरेन यांची हत्या झाली, की त्यांनी आत्महत्या केली हे स्पष्ट होणार आहे.
हिरेन गुरुवारपासून होते बेपत्ता
ठाण्यात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन टीमला रेतीबंदर खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाला आहे. गाळात रुतलेल्या अवस्थेत हा मृतदेह मिळाला आहे. कालपासून हिरेन हे घरात नव्हते. आज मृतदेह मिळाल्याने त्यांच्या मृत्यूचे गूढ निर्माण झाले आहे. त्यांच्या मृत्यूमागे काय कारण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत.