मुंबई - मुंबईत सुरू असलेल्या नकली नोटा छपाईच्या कारखान्याची माहिती मिळताच शनिवार (दि. 17 सप्टेंबर)रोजी मानखुर्द पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख १६ हजार १५० रुपयांच्या नकली नोटा आणि छपाईसाठी लागणारे साहित्य असा एकूण ९ लाख १६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नकली नोटा छापून बाजारात चलन आणण्यासाठी आरोपी रोहित शहा (२२, रा. कांदिवली) याने मानखुर्द परिसरातील जोर्तिलिंग नगरातल्या डुक्कर चाळीमध्ये एक रुम भाडेतत्त्वावर घेतला होता. वरच्या माळ्यावरील घरात शहाने नकली नोटा छपाईचा कारखाना सुरू केला होता. तेथे ५०, १०० व २०० रुपयांच्या भारतीय चलनातील नोटांसारख्या हुबेहूब नोटा तो छापत होता.
याबाबतची माहिती समजताच मानखुर्द पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात नकली नोटा व छपाईचे साहित्य आढळून आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी नोटा छापण्यासाठी वापरलेले प्रिंटर, कलर बॉटल, लॅपटॉप जप्त केले. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून रोहित शहा याला अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजू सुर्वे करत आहेत.