मुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या मोटार वाहनावर चुकीच्या पद्धतीने आलेल्या चलनाचा तपास मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून केला जात होता. यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक विभागाकडून तपास केला जात असताना मिळालेल्या माहितीवरून, मुंबईत एक वाहनचालक हा रतन टाटा यांच्या बनावट वाहन क्रमांकाचा वापर करत असून टाटांच्या गाडीचा नंबर स्वतःच्या वाहनावर लावून तो मुंबईमध्ये फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
चुकीचे ई-चलन वर्ग
यासंदर्भात माटुंगा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. मुंबईत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला जात असताना पोलिसांना आढळून आले, की नरेंद्र फॉरवर्ड प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची असलेली एक गाडी पोलिसांना आढळून आली. या गाडीवर रतन टाटा यांच्या वाहनाचा नंबर लावण्यात आलेला होता. पोलिसांनी आरोपीकडे याबद्दल चौकशी केली असता, हा आरोपी अंकशास्त्राचा फायदा घेण्यासाठी मूळ नंबर प्लेटमध्ये बदल करून रतन टाटा यांच्या गाडीच्या नंबरचा वापर करत असल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी नरेंद्र फॉरवर्ड प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांच्या विरोधात बनावट नंबर प्लेटचा वापर करून कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कलम 420, 465नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबरोबरच रतन टाटा यांच्या मोटार वाहनावरील चुकीचे ई-चलन हे आरोपीच्या वाहनावर वर्ग करण्यात आल्याचेही वाहतूक पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पाच हजारांचे बक्षीस
रतन टाटा यांच्या गाडीच्या नंबर प्लेटचा वापर करून शहरात गाडी चालविणाऱ्याचा छडा लावणाऱ्या मुंबई पोलीस खात्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप फणसे व पोलीस हवालदार अजीज शेख यांना पोलीस विभागाकडून पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.