मुंबई -हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा अध्यक्ष अध्यक्षपदाच्या कार्यक्रम जाहीर करावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची रविवारी (दि. 26) भेट घेऊन ( Mahavikas Aghadi Leaders Meets Governor ) निवेदन दिले. दरम्यान, कायदेशीर प्रक्रियांचा अभ्यास करून निर्णय देतो, अशी ग्वाही राज्यपालांनी ( Governor Bhagat Singh Koshyari ) दिली आहे. राज्यपालांच्या अनुभव मोठा आहे. ते योग्य निर्णय घेतील, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिष्टमंडळाने घेतली भेट
राज्य विधिमंडळाचे दोन आठवड्याचे हिवाळी अधिवेशन होत आहे. पहिल्या आठवड्यात अधिवेशनाचे कामकाज अध्यक्षविना पार पडले. तर गेल्या आठ महिन्यांपासून उपाध्यक्ष कार्यभार सांभाळत आहेत. आता विधानसभा अध्यक्ष पदाची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खुल्या किंवा आवाजी मतदानाने निवड प्रक्रिया होईल, असा बदल केला आहे. येत्या दोन दिवसांत निवडणूक प्रक्रिया व्हावी, यासाठी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाविकास आघाडी सरकारतील प्रमुख नेते बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
राज्यपालांचा अनुभव मोठा
विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर करण्यास अनुमती द्यावी, याबाबतचे निवेदन राज्यपालांना दिले. कायदेशीर चर्चा करून सोमवारी (दि. 27) निर्णय कळवतो, असे राज्यपालांनी सांगितले आहे. अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत केलेल्या कोणत्याही बदलाबाबत विचारणा झाली नाही. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. देशातील इतर संसदीय कामकाजा प्रमाणे बदल केले आहेत. राज्यपालांना अधिकार आहेत ते माहिती घेतील आणि निर्णय देतील. त्यांचा अनुभव मोठा असून योग्य निर्णय देतील, अशी माहिती काँग्रेसचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
राज्यपालांचा निर्णय सोमवारी येईल
विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घ्या, असे पत्र राज्यपालांनी दिले होते. त्यानुसार रविवारी त्यांची भेट घेतली. येत्या दोन दिवसात निवडणूक व्हावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे. त्यावर कायदेशीर चर्चा करून सोमवारी निर्णय कळवतो, असे राज्यपालांनी सांगितले आहे. आम्हाला अपेक्षा आहे ते सकारात्मक निर्णय घेतील, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, 12 आमदारांच्या संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा - Year Ender 2021 : आघाडी सरकारची राज्यपालांशी फारकत ठरतेय डोकेदुखी