मुंबई - विधानसभा निवडणुकीची खरी रणधुमाळी ही उमेदवारी अर्ज भरण्यापासूनच सुरू होत असते. राज्यात 21 ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानासाठी प्रत्येक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 ऑक्टोबर शुक्रवार हा शेवटचा दिवस असल्याने, पक्षाकडून तिकीट मिळालेल्या आणि न मिळालेल्या अशा बहुतांश उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज गुरूवारी दाखल केला आहे. गुरूवारी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची संख्या पाहता, हा उमेदवारी अर्जांचा महागुरूवार ठरला आहे... वाचा कोणत्या मतदारसंघातून कोणत्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला आहे ....
हेही वाचा... जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवार अर्ज दाखल
- परळी विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे तर भाजपकडून पंकजा मुंडे-पालवे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
- वरळी विधानसभेसाठी शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी आदित्य यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे.
- कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून रोहित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थीत होते.
- सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून अर्ज भरला आहे. देशमुख यांनी 2014 च्या निवडणुकीमध्येही दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विजय मिळविला होता त्यानंतर आता दुसऱ्यांदा देशमुख या मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत.
- अमरावती विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजप आणि शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भव्य मिरवणूक काढली.
- हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उभे असलेले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी शक्तिप्रदर्शन करत महाआघाडीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे.
- सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. देशमुख हे भाजपकडून चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत यापूर्वी तीन वेळा देशमुख उत्तर सोलापूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
- काँगेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रणिती शिंदे या काँग्रेस कडून तिसऱ्यांदा निवडणूक लढवीत आहेत. मागील 2 वेळा त्या या मतदार संघातून विजयी झाल्या आहेत.
हेही वाचा... आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख; मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज भरणार अर्ज
- बोईसर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर संतोष जनाठे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत, अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.
- शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जळगाव ग्रामीण मतदारसंघातून भाजप-सेना महायुतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. या मतदारसंघात गुलाबराव पाटलांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पुष्पा महाजन यांचे आव्हान असणार आहे. पुष्पा महाजन यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्या यादीत उमेदवारी देण्यात आली आहे.
- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मतदारसंघात जाहीर मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना आवाहन केले, त्यानंतर मोजकेच नेते आपल्या सोबत घेऊन क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा... आदित्य ठाकरेंविरोधात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात
- यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या वतीने बाळासाहेब मांगुळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
- धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी आणि त्यांच्या पत्नी शीतल ठाकूर यांनी भाजप आणि अपक्ष असे 2 उमेदवारी अर्ज दाखल केले.
- बोईसर विधानसभेसाठी महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विलास तरे यांच्याकडून शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आला.
- नांदेड दक्षिणमधून शिवसेनेच्या राजश्री हेमंत पाटील यांची उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेने नांदेडमध्ये महिलेला उमेदवारी दिली असुन पाटिल यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेड दक्षिण या मतदार संघातुन हेमंत पाटिल आमदार होते, लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटिल हिंगोलीमधुन निवडून गेले होते.
- लातूर जिल्ह्यात गुरुवारी काँग्रेस- भाजपच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंग्यात मोठे शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला.
- इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांनी भाजपकडून अर्ज भरला. इंदापूर शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
हेही वाचा... भाजपची चौथी यादी जाहीर; खडसे, तावडे, मेहता, पुरोहित यांना डच्चू
- यवतमाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये पालक मंत्री मदन येरावार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप, शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- बडनेरा विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार प्रिती बँड यांनी मतदारसंघात भव्य मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यावेळी उपस्थित होते.
- भोकर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शनासह दाखल केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे याच मतदारसंघातून मैदानात असल्याने भोकरच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.
- हजारो कार्यकर्ते आणि समर्थकांसह डॉ.सुनील देशमख यांनी अमरावती विधानसभेसाठी अर्ज भरला आहे.
- परभणी येथील शिवसेना आमदार डॉ.राहुल पाटील यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
- दिग्रस मतदार संघातून वसेनेचे संजय राठोड यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
- माढा विधानसभा मतदारसंघासाठी नगराध्यक्ष मीनल साठे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माढाची जागा शिवसेनेला दिली असली, तरी मीनल साठे यांनी अर्ज दाखल करून बंडखोरी केली आहे.
हेही वाचा... काँग्रेसला उभारी देण्यासाठी खुद्द राहुल गांधीच मैदानात, रोड शो द्वारे करणार शक्तिप्रदर्शन
- मावळ आणि चिंचवडमधून महायुतीच्या उमेदवारांनी भरला अर्ज. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यापूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मतदारसंघात पदयात्रा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
- मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांनी आजी माजी खासदारांच्या उपस्थित भरला उमेदवारी अर्ज. विधानसभा मतदारसंघासाठी कोटे यांनी विभागातून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला.
- भाजपचे जेष्ठ नेते, विधान परिषदेचे आमदार अरुण अडसर यांचे पुत्र प्रताप अडसर यांनी चांदुर रेल्वे येथे मोठे शक्तिप्रदर्शन करत अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघासाठी भाजप पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे आमदार विरेंद्र जगताप, वंचित आघाडीचे निलेश विश्वकर्मा व भाजपचे प्रताप अडसर या तीन उमेदवारांमध्ये या मतदारसंघात लढत होणार आहे.
- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी माजी खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. तसेच भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले, दीपक पवार यांनीही सातारा-जावळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा... रोहित पवार विजयी होणारच! आईसह पत्नीने व्यक्त केला विश्वास
- यवतमाळ मतदारसंघासाठी बाळासाहेब मांगुळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थीतीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
- राज्याचे कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी जळगाव जामोद मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. शहरातून जळगाव जामोद येथील उपविभागीय कार्यालयापर्यंत रॅली काढतकुटे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.
- समीर मेघे यांनी हिंगणा विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागाने भव्य रॅली काढण्यात आली.
- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. विजय वडेट्टीवार हे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातुन दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून संदीप गड्डमवार हे रिंगणात आहे.
हेही वाचा... राणे समर्थक सतीश सावंत कणकवलीतून अपक्ष लढणार; नितेश राणेंना फोडणार घाम?
- परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याशिवाय इतर 4 अपक्ष उमेदवारांनी देखील कुठलेही शक्तिप्रदर्शन न करता अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी शिवसेनेचे विशाल कदम आणि 'वंचित'च्या करुणा कुंडगीर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
- वर्ध्यातील देवळी पुलगावची जागा शिवसेनेला सुटल्याने भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समीर देशमुख यांनी पदाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. समीर हे सहकार नेते सुरेश देशमुख यांचे चिरंजीव आहे. गुरूवारी भाजपच्या वतीने जिल्ह्यातील तीन मतदार संघात भाजपकडून उमेदवारी दाखल केली आहे.
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भाजपच्या नगरसेविका जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सीमा सावळे यांनी भाजपाशी बंडखोरी करत अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघातून मोठे शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला.
- हिंगोली, वसमत आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विविध पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हिंगोलीत काँग्रेसचे उमेदवार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. वसमत येथे शिवसेनेकडून डॉ. जयप्रकाश मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू नवघरे आणि वंचितकडून मुनिर पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संतोष बांगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
- शिवसेनेतर्फे पालघर विधानसभा मतदारसंघासाठी श्रीनिवास वनगा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
- मनसे नेता महेश कदम यांनी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला.
- जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे एरंडोलचे विद्यमान आमदार डॉ. सतीश पाटील यांनी आघाडीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी रॅलीद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
- पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले भाजपचे नेते माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी बंडखोरी करत गोंदिया विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. हजारो समर्थकांच्या उपस्थीतीत विनोद अग्रवाल यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा... नालासोपारा मतदारसंघासाठी 'बविआ' आणि 'शिवसेना' उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल
- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी या विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे विद्यमान आमदार संजय पुराम यांनाच भाजपचे तिकीट मिळाल्याने संजय पुराम यांनी देवरी येथे भाजप कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत असून काँग्रेसचे उमेदवार सहसराम कोरेटी हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
- रिसोड विधानसभा मतदारसंघासाठी एमआयएमच्या वतीने तसवर खान तसेच वंचित बहुजन आघाडीकडून दिलीप जाधव यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत रिसोड उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
- पाटण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांनी गुरुवारी साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
- नालासोपारा विधानसभा मतदारसंघासाठी बहुजन विकास आघाडीतर्फे आमदार क्षितीज ठाकूर, आमदार हितेंद्र ठाकूर व प्रविणा ठाकूर यांनी, तर शिवसेनेकडून माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी उमेदवारी भरले आहेत. यावेळी दोन्ही पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करून रॅली काढण्यात आली.
- अकोट विधानसभा मतदारसंघात लोक जागर मंचच्या माध्यमातून काम करणारे, अनिल गावंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु हा मतदारसंघ भाजपला सुटल्याने अनिल गावंडे हे सेनेशी बंडखोरी करत शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.