गडचिरोली - कोरोना महामारीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांची पहिली घंटा आज (23 नोव्हेंबर) वाजली. आठ महिन्यानंतर शाळा सुरु होणार म्हटल्यावर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. परंतु, कोरोना महामारीचे संकट अद्यापही दूर न झाल्याने 'मस्ती'ची पाठशाळा आता 'धास्ती'ची पाठशाळा झाली आहे. त्यामुळेच गडचिरोली शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांविनाच शाळेची घंटा वाजल्याचे चित्र दिसून आले.
- अनेक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह-
23 नोव्हेंबर म्हणजे आज सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. तत्पूर्वी या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांना कोरोना तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील 2 हजार 756 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये अनेक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.
- बोटावर मोजण्याइतक्या विद्यार्थ्यांची उपस्थिती -
कोरोनाचा संसर्ग विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार प्रत्येक शाळांनी वर्गखोल्यांची स्वच्छता केली. सॅनिटायझर, ऑक्सीमीटर, थर्मामीटर असे साहित्य शाळेमध्ये उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांची तपासणी करणार होते. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे पहिल्याच दिवशी अनेक शाळांमध्ये बोटावर मोजण्याइतक्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.