मुंबई - देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना चाचण्या झाल्याने, राज्यात कोरोना रुग्णसंख्या अधिक असल्याचा दावा राज्य सरकार करत आहे. असे असले तरीही दहा लाख (टेस्ट पर मिलियन) लोकसंख्येमागे चाचण्या करण्यात महाराष्ट्र देशात नवव्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, देशातील सरासरी कोरोना पॉझिटिव्हिटी ९ टक्के असून कोरोना पॉझिटिव्हिटीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण हे १८.८३ टक्के इतके आहे. मुख्य लक्षण असलेल्या रुग्णांचीच तपासणी होत असल्याने हे प्रमाण अधिक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
देशात इतर राज्यांची तुलना करता मेघालयात देशातील सर्वात कमी कोरोना पॉझिटिव्हिटीची नोंद झाली. मेघालय राज्याची कोरोना पॉझिटिव्हिटी १.८८ टक्क्यांवरून १४ ऑगस्ट रोजी १.६९ टक्के इतकी झाली आहे. त्यानंतर गुजरातमध्ये २.२६ टक्के आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये २.९३ टक्के कोरोना पॉझिटिव्हिटी नोंदवण्यात आली. त्याखालोखाल बिहारमध्ये ३.५६ टक्के आणि मध्य प्रदेश ४.४७ टक्के. गेल्या आठवड्यापासून अंदमान आणि निकोबार बेटीवर सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण असून ५६. ७५ टक्के नोंद झाली आहे. पुद्दुचेरी देखील २९.०६ टक्क्यांसह दुसर्या क्रमांकावर राहिले आहे.
हेही वाचा - मुंबईत वाढतोय देहव्यापार; अल्पवयीन मुली, महिलांच्या मानवी तस्करीत मोठी वाढ
महाराष्ट्र १८.८३ टक्क्यांनी तिसर्या स्थानावर आहे. गेल्या आठवड्यापासून खाली येणारे गोवा राज्य १८.३३ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर, तर चंदीगडमध्ये १७.०८ टक्के कोरोना पॉझिटिव्हिटी आहे. गेल्या आठवड्यात आंध्र प्रदेश पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले होते. आता हे राज्य १६.४६ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. १९ ऑगस्ट २०२० पर्यंत महाराष्ट्रात राज्याच्या आरोग्य विभागामार्फत दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ३३ लाख ३७ हजार ८४८ नमुन्यांपैकी ६ लाख २८ हजार ६४२ नमुने पॉझिटिव्ह (१८.८३ टक्के) आले आहेत. राज्यात ११ लाख ६२ हजार ४५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
सध्या, राज्यात ३७ हजार ०९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील मृत्यूदर ३.३५ टक्के इतका आहे. प्रारंभीपासूनचा कोरोना संसर्गाचा दर पाहिला, तर तो आता १९ टक्क्यांवर गेला आहे. अलिकडे दररोजच्या कोरोना चाचण्या आणि रूग्णसंख्या पाहिली, तर तो जवळजवळ २५ टक्के झाला आहे. देशातील एकूण रूग्णसंख्येत महाराष्ट्रात ३० टक्के रुग्ण तर मृत्यूसंख्येत महाराष्ट्राचा वाटा ४४.६३ टक्के इतका भीषण आहे.
कोरोना राज्यात मोठ्या प्रमाणात शिरकाव करतोय आणि अशावेळी अधिकाधिक चाचण्या, हाच एकमात्र उपाय आहे. हे पक्के ठरविण्याची वेळ आता आली आहे. मात्र, अजुनही चाचण्यांवर म्हणावे तसे लक्ष केंद्रीत केले गेले नाही. हीच स्थिती कायम राहिल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे चाचण्यांची पूर्ण क्षमता वापरावी, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - २०१२ मध्येच चीनमधील खाणकामगारांना झाला होता कोविडसदृश आजार; शास्त्रज्ञ डॉ. मोनाली रहाळकर यांचे संशोधन
कोरोनासाठी लागू केलेला लॉकडाऊन अंतर्गत आपल्याकडे पूर्णपणे जिल्हाबंदी नाही आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांमधील लोक, पास घेऊन जाणारे लोक, असे अनेक लोक आहेत. यातून थोड्या प्रमाणात का होईना व्हायरसचा प्रसार होणे स्वाभाविक आहे. जिल्हाबंदी नसती तर आपल्याला यापेक्षा खूप अधिक केसेस पाहायला मिळाल्या असत्या. विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये दिसणाऱ्या केसेसपैकी 85 टक्के ते 90 टक्के केसेस या मुंबईहून प्रवास करून आलेल्या लोकांमध्ये होत्या.
या व्हायरसचा प्रवास लक्षात घेतला तर टप्प्याटप्प्याने असेच होणे अपेक्षित होते. हा व्हायरस परदेशातून आल्यामुळे आधी तो शहरांमध्ये मर्यादित राहिला. कारण परदेशात प्रवास करून येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या शहरांमध्ये जास्त असते, असे राज्याचे रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले.
महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रसाराची सुरुवात पुणे-मुंबई या दोन प्रमुख शहरांमध्ये झाली. सुरुवातीचा बराच काळ कोरोनाचे रुग्ण प्रामुख्याने मुंबईत आढळत होते. त्यामुळे राज्य शासनाचा मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यावर विशेष भर होता. पण आता चार महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटल्यानंतर या व्हायरसचा प्रसार पुणे-मुंबई बाहेर जास्त वेगाने होत असल्याचे दिसत आहे. निव्वळ दैनंदिन रुग्णांची संख्या पाहिली तर नाशिक, जळगाव, नांदेड, नागपूर या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अजूनही गंभीर असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतील केईएम, नायर आणि सेंट जॉर्ज रूग्णालय, पुणे आणि पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती आणि अकोला, नागपूर, एमएमआर क्षेत्रातील पनवेल, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मिरा भाईंदर तसेच नाशिक, मालेगाव, जळगाव आणि औरंगाबाद इत्यादी ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला होता. या दौर्यानंतर त्यांनी सद्य स्थितीबाबत तपशीलवार पत्र राज्य सरकारला लिहिले आहे.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी धोनीला लिहिले पत्र, म्हणाले...
रूग्णालयाबाहेर झालेले 600 मृत्यू अद्याप मुंबई महापालिकेने जाहीर केलेले नाहीत. त्यासंबंधीच्या आकडेवारीची तत्काळ पडताळणी करून ती संख्या जाहीर करण्यात यावी. तसेच दिनांक 10 जुलै 2020 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात मुंबईतील 275 मृत्यू हे अन्य कारणांमुळे झाले, असे दर्शविण्यात आले आहेत. आयसीएमआरने कोणते मृत्यू कोरो नामृत्यू समजावे आणि कोणते नाही, यासंदर्भात अतिशय स्पष्ट दिशानिर्देश दिले आहेत. असे असताना ते अन्य कारणांमुळे झाले, असे दाखवणे योग्य नाही. ते कोरोनाबळींच्या संख्येत दाखवण्यात यावेत, या प्रमुख मागण्या विरोधी पक्षनेते फडणीस यांनी केल्या आहेत.
कोविडचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असणार्या शहरातील आणि जिल्ह्यात सध्या उपलब्ध रुग्णवाहिका या वाढत्या रुग्णसंख्येला पुरेशा नाहीत. त्याही आवश्यकतेनुसार तत्काळ उपलब्ध करुन द्याव्यात, तसेच सामाजिक संघटनांची सुद्धा मदत घेऊन रुग्णवाहिकांची संख्या तातडीने वाढवण्यात यावी. अॅक्टमेरा, रेमडेसिवीर ही औषधेचा सर्रास काळाबाजार केला जातो आहे. ही औषधे तत्काळ आणि सहज उपलब्ध होण्यासाठी यंत्रणा उभारण्यात यावी. कोविडला प्राधान्य देताना नॉन-कोविड रुग्णांकडे मोठे दुर्लक्ष होत आहे.
अर्थात कोरोनाकडे लक्ष देण्याला प्राधान्य असलेच पाहिजे. पण, त्यामुळे इतर रूग्णांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांच्याही मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नॉन-कोविड रुग्णालये सुद्धा योग्य प्रमाणात उपलब्ध असतील, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. उदा. नवी मुंबई येथे नॉन-कोविड रुग्णांची मोठया प्रमाणात हेळसांड होते आहे. एमएमआर क्षेत्रातील जे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मुंबईत येतात, त्यांची निवास/भोजन व्यवस्था मुंबईत करण्यात यावी.
त्यामुळे त्यांच्या आवागमनामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत मिळेल. त्यांना चांगली सुविधा आणि या कठीण काळात सेवा देत असल्याबद्दल प्रोत्साहनपर भत्ता द्यावा. डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस आदी कोविड योद्ध्यांना कोरोना झाल्यास त्यांच्या उपचारासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी. मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामध्ये समन्वय असणे अतिशय गरजेचे असून संबंधितांना सूचना देणे आवश्यक आहे.
हेही वाचा - जी-मेल सेवा बाधित; पूर्ववत करण्यासाठी गुगलचे प्रयत्न सुरू