मुंबई - राज्यात डिसेंबर महिन्यापासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ (Corona Cases Hike) होत आहे. ही वाढ अशीच सुरू राहून जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून (January 3rd week) तिसऱ्या लाटेचा परिणाम (Corona Third Wave) पाहायला मिळेल. तिसऱ्या लाटेत बाधित रुग्णांची संख्या ८० लाखांपर्यंत जाऊ शकते, तर मृत्यूचा आकडा ८० हजारांपर्यंत पोहचेल, अशी शक्यता आरोग्य विभागाचे अप्पर सचिव डॉ. प्रदीप व्यास (Dr. Pradeep Vyas) यांनी व्यक्त केली आहे. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या २ लाखांच्या वर पोहचेल, असा अंदाज राज्याच्या आरोग्य विभागाकडून (State Health Department) वर्तवण्यात आला आहे.
- उपाययोजना करा -
राज्यात गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार सुरु आहे. या प्रसारादरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात राज्य सरकारला यश आले आहे. मात्र जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार झाला आहे. डिसेंबर महिन्यात राज्यातील कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. हा प्रसार रोखण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. प्रदीप व्यास यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ यांना पत्र लिहून कोरोना रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत सूचित केले. त्यांनी कोरोनाच्या संकटाची जाणीव या पत्राद्वारे या अधिकार्यांना करून दिली आहे. कोरोनाची लक्षणे सौम्य आढळत आहे, रुग्णालयीन रुग्णसंख्या कमी आहे या भरोशावर राहू नका. वैज्ञानिकदृष्ट्या विचार करून उपाययोजना करा असे निर्देश दिले आहेत.
- मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढणार -
कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी विशेष उपाययोजनांचे पत्र जाहिर करण्यात आले आहे. त्यात तिसऱ्या लाटेत कोविड रुग्णांची संंख्येत व मृत्यूच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, ओमायक्रॉन सौम्य असे गृहित न धरता त्या विरोधातील सर्व उपाययोजना कराव्या, यासह ज्यांचे लसीकरण झालेले नाही, त्यांचे लसीकरण करुन घ्यावे, त्यांच्यासाठी कोरोनाचा धोका हा पहिल्या लाटेप्रमाणेच गंभीर असून तिसर्या लाटेत हा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तिसर्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढणार आहे, अशी शक्यता व्यास यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करा व राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवा, अशा सूचना व्यास यांनी पालिका आयुक्त व जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत.
- या उपाययोजना करा -
जर कारोना रुग्ण लक्षण विरहित असेल तर त्याला घरच्या घरी विलगीकरणात राहण्याची परवानगी द्या. ओमायक्रोन संसर्गाचा वेग पाहता असा रुग्ण घरी जाऊ नये किंवा समाजात मिसळू नये यासाठी काटेकोरपणे लक्ष द्या. कोरोना संदर्भातील कॉल सेंटर्स सुरू करा. त्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करा. ऑक्सिजन सॅच्युरेशन, ६ मिनिटांची चालण्याची चाचणी यांचेही मार्गदर्शन या कॉलसेंटरवरून व्हायला हवेत. तसेच रुग्णाला अॅडमिट होण्यासाठी कोरोना रुग्णांची माहिती पुरवण्याबरोबरच ही कॉल सेंटर अॅम्बुलन्स नेटवर्कसोबत जोडा असे व्यास यांनी पत्रात म्हटले आहे.