मुंबई - कोरोना महामारीविरूद्धच्या लढाईत भारताने एक महत्त्वपूर्ण टप्पा प्राप्त केला आहे. भारताने गुरुवारी 100 कोटी लसींच्या डोसचा ऐतिहासिक आकडा पार केला. लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे आकडे सांगतात. संपूर्ण लसीकरणात (दोन्ही डोस) राज्यात 2 कोटी 88 लाख नागरिकांनी लस घेतली आहे. तर आतापर्यंत एकुण 9 कोटी 32 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे.
संपूर्ण लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर -
कोविडच्या विरोधात नऊ महिन्यातच ही कामगिरी साध्य करण्यात आली आहे. 100 कोटी लसीच्या डोसचा आकडा पार केल्यावर देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. केंद्र सरकारने यानिमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. लसीकरणात संपूर्ण डोसमध्ये महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. तर लसीकरणाच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 12.21 कोटीहून अधिक लोकांनी येथे लस घेतली आहे. पूर्णपणे लसीकरण अर्थात दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या सुमारे 2 कोटी 78 लाख आहे. 9.32 कोटी लसीकरणाच्या डोजसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. संपूर्ण लसीकरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. येथे दोन्ही डोस घेणाऱ्या लोकांची संख्या 2.88 कोटी आहे. पश्चिम बंगाल तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 6.85 कोटी डोज देण्यात आले आहेत. तर 1.87 कोटी लोकांनी दोन्ही डोज घेतले आहेत. गुजरात चौथ्या क्रमांकावर आहे, जिथे सुमारे 6.76 कोटी लोकांचे लसीचे डोज देण्यात आले. येथे 2.35 कोटी लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोज मिळाले आहेत. 6.72 कोटी लोकांना लसीकरण करून मध्य प्रदेश पाचव्या स्थानावर आहे.
राज्यातील कोरोनास्थिती -
राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. बुधवारी 20 ऑक्टोबरला रुग्णसंख्येत किंचित वाढ होऊन 1825 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 21 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर 2 हजार 897 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात रोज 2 ते 3 हजारांदरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात घट होऊन 11 ऑक्टोबरला 1,736, 16 ऑक्टोबरला 1,553, 17 ऑक्टोबरला 1,715, 18 ऑक्टोबरला 1,485, 19 ऑक्टोबरला 1,638 रुग्णांची नोंद झाली. बुधवारी 20 ऑक्टोबरला त्यात किंचित वाढ होऊन 1, 825 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.43 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
लसीकरणातील पहिले पाच राज्य -
- उत्तर प्रदेश - 12,21,40,914
- महाराष्ट्र - 9,32,04,982
- पश्चिम बंगाल - 6,85,12,932
- गुजरात - 6,76,67,900
- मध्य प्रदेश - 6,72,24,286