मुंबई- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. हवामान विभागाने या चंक्रीवादळा 'गुलाब' चक्रीवादळ असे नाव दिले आहे. हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिसा किनारपट्टी भागत धडकणार आहे. त्यामुळे या वादळाचा किनारपट्टी भागाला फटका बसणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने या सर्व परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. दरम्यान, किनारपट्टी भागातून हे वादळ ओडिसा,छत्तीसगडमधून विदर्भाच्या दिशेने आगेकूच करणार असल्याने या वादळाचा महाराष्ट्रालाही काही प्रमाणात फटका बसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
सोमवारी 27 सप्टेंबरपासून पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात पाऊस पडेल. तसेच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 'गुलाब' चक्रीवादळामुऴे महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत या परिसरामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच कोकणातील किनारपट्टी परिसरामध्ये जोरदार वारे वाहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस -
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून शनिवारी ‘गुलाब’ चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. आयएमडीच्या वादळ चेतावणी विभागानं हे चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकण्याची आणि रविवारी संध्याकाळी उत्तर आंध्र प्रदेश मधील कलिंगपट्टणम, दक्षिण ओडिशाच्या गोपालपूर किनारपट्टीवरुन जाण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण बघायला मिळेल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. सोमवारी 27 सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ऑरेंज अलर्ट -
पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र गेल्या काही तासात पश्चिमेकडे सरकले आहे. यामुळे ‘गुलाब’ चक्रीवादळ तीव्र झाले असून उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशासाठी वादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अत्यंत खराब हवामान असताना ऑरेंज अलर्टच्या इशारा दिला जातो. या दरम्यान रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद होण्याची आणि वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. या दरम्यान, वारे 70-80 किमी प्रति तास वेगाने वाहू शकतात.
हेही वाचा - ओडिशात चक्रीवादळ धडकणार असल्याचा हवामान विभागाचा इशारा; सात जिल्ह्यांत बचाव पथके तैनात
हेही वाचा - हवामान खात्याचा इशारा: आजपासून राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता