मुंबई - दिवसेंदिवस एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. गेले काही दिवस एसटी महामंडळाचे कर्मचारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करत आहेत. संघर्ष एसटी कामगार युनियनने या आंदोलनाचा निर्णय जरी घेतला नसला, तरी या आंदोलनाला विरोध न करता संघर्ष एसटी कामगार युनियन एसटी कामगारांसोबत संघर्षामध्ये उभी असल्याची माहिती संघर्ष एसटी कामगार युनियनचे नेते शशांक राव यांनी दिली आहे.
कमिटी नेमण्याचे राजकारण सुरू -
महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडे उदासीन दृष्टीकोनातून पहात असून पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कमिटी नेमण्याचे राजकारण सुरू आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी समित्यांचा कटू अनुभव यापूर्वी चाखला आहे, त्यामुळे त्यांचा अशी कमिटी बनवण्यास सक्त विरोध आहे. आम्ही यापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, एसटी महामंडळाचे सर्व कर्मचारी आणि मालमत्ता ताब्यात घ्या, एसटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी घोषित करून १ जानेवारी २००६ पासून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनादि सर्व सेवा शर्ती लागू करा, अशी मागणी केलेली असल्याची माहिती संघर्ष एसटी कामगार युनियनचे नेते शशांक राव यांनी दिली आहे.
एसटी बंदचा निर्णय -
महाराष्ट्र शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर कमिटी कमिटी असा खेळ न करता एसटी महामंडळाच्या महाराष्ट्र सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीवर निर्णय घ्यावा, यासाठी आजपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय करून, संघर्ष एसटी कामगार युनियनने महाराष्ट्राच्या सर्व आगारात एसटी बंदचा निर्णय घेतला असल्याची माहिती शशांक राव यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रामधून दिली आहे.