मुंबई - प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्यासाठी मुंबईमधील विमानतळाला आणखी काही मुदत द्यावी, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांना केली आहे. आज जनतेला संबोधन करताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली.
२५ मेपासून देशभरातील प्रवासी विमान वाहतूक काही प्रमाणात सुरू करण्यात येणार असल्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाने याआधी जाहीर केले होते. याबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, की मुंबईमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या यासाठी तयार नाही. त्यामुळे तेथून शक्य तेवढ्या कमी विमानांचे उड्डाण करण्यात यावे, अशी विनंती मी नागरी उड्डाण मंत्रालयाला केली आहे. यामध्ये केवळ अत्यावश्यक आणि तत्सम विमानसेवांचा समावेश असावा, जसेकी देशात अडकलेले विदेशी नागरीक, किंवा विदेशात अडकलेले भारतीय; वैद्यकीय इमर्जन्सी, विद्यार्थी अशांसाठी करण्यात येणाऱ्या विमानसेवा असेही त्यांनी स्पष्ट केले.
चौथ्या लॉकडाऊनमध्ये देशभरातील ठप्प झालेले व्यवहार हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांपैकीच एक म्हणून प्रवासी विमान वाहतूकीस केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र प्रवासी विमान, तसेच प्रवासी रेल्वे वाहतुकीसाठी तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये लागू असलेले नियमच लागू आहेत. त्यामुळे राज्यात जिल्ह्यांतर्गत रेल्वे वाहतुकीसही परवानगी नाही.
हेही वाचा : चिंताजनक..! एकाच दिवसात 3 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण सापडले