मुंबई - अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प वाचायला सुरुवात केल्यानंतर, सुरुवातीला तर हा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे की काय, असे वाटल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले. आज राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. यातील तरतुदी पाहून गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
हेही वाचा... आर्थिक आघाडीवर महाराष्ट्र पुन्हा अव्वल करणार - अजित पवार
फसवा अर्थसंकल्प - गिरीश महाजन
आज विधानसभेत सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा, महाराष्ट्राला फसवणारा अर्थसंकल्प असल्याचे भाजप आमदार आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. तसेच अजित पवार अर्थसंकल्प वाचत असताना आम्हाला हा पुण्याचा अर्थसंकल्प आहे की महाराष्ट्राचा, असे वाटत होते. अशी बोचरी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
जलसंपदा विभागाच्या अंतर्गत राज्यामध्ये अनेक मोठ्या योजना सुरू केल्या होत्या. परंतु आता राज्य सरकारने ठराविक विभागातच जलसंपदा विभागाच्या योजना राबवण्याचे ठरवले दिसत आहे. अनेक अपूर्ण योजनांच्या पूर्णत्वासाठी अर्थसंकल्पात केलेली तरतूद आणि तो निधी पुरेल का ? हा प्रश्न असल्याचेही महाजन यांनी म्हटले आहे.
अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कामगार आणि शहरी भागातील जनता यांनाही डावलण्यात आले आहे. यासंदर्भात अर्थसंकल्पीय चर्चेत आम्ही सरकारला जेरीस आणू, अशी भावना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. भाजप सरकारच्या काळात सुरू केलेल्या अनेक लोकोपयोगी योजनांना अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद केली नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.