मुंबई - बर्ड फ्लूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये, यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. माणसांमध्ये या रोगाचे संक्रमण होत नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते वर्षा निवासस्थान येथील समिती सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बर्ड फ्लू संदर्भांतील राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दक्षता घेण्याच्या विविध सूचना दिल्या आहेत.
निर्देशांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचना -
मुख्यमंत्री ठाकरे यांनी बर्ड फ्लू संदर्भात आढावा घेवून नंतर लगेचच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे बर्ड फ्लू संक्रमण आणि घ्यावयाची काळजी या संदर्भात निर्देश दिले. या संदर्भातील निर्देशांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहे. पक्ष्यांमधील बर्ड फ्लू रोगाचे तात्काळ निदान होण्याकरीता राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागासाठी जैवसुरक्षास्तर 3 ही अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. ज्या भागात बर्डफ्लू रोगाची लागण नाही, अशा भागात अंडी व मांस 70 डिग्री पेक्षा जास्त तापमानात शिजवून खाल्ल्यास काहीही धोका नाही. त्यामुळे गैरसमज व अफवा पसरविण्यात येवू नयेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा-'बर्ड फ्लू'मुळे मुरुंबा गावात संचारबंदी, पोलीस बंदोबस्त तैनात
पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, परभणीत 843 कोंबड्या, ठाण्यात बगळे व इतर पक्षी मिळून 15, रत्नागिरीत 9 कावळे यांचे बर्ड फ्लू अहवाल एच5एन1 आला आहे. तर बीड येथील 11 कावळ्यांचा अहवाल एच5एन8 असा आला आहे. उर्वरित ठिकाणचे अहवाल भोपाळहून प्राप्त होणार आहेत. पशुसंवर्धन विभागाने बर्ड फ्लू मार्गदर्शक सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत. केंद्र सरकारच्या उपाययोजनांच्या कृती आराखड्याप्रमाणे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे या सूचनांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात 7 जानेवारीपासून नियंत्रण कक्ष स्थापित केले आहेत. मृत पक्षांची माहिती घेणे सुरू आहे. पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात यावे, अशाही सूचना देण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्तांना दिली.
हेही वाचा-देशातील सात राज्यात 'बर्ड फ्लू'चा प्रसार, इतर राज्ये सतर्क
या बैठकीला पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपास्थित होते.
दरम्यान, देशातील सात राज्यात बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यावसायिक नुकसान होण्याच्या भीतीने धास्तावले आहेत.