मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांना केलेल्या फोनचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकारानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट बेकायदा ठरल्यानंतर आता वांद्रे पूर्वेकडील कार्यालयावर कारवाईचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. दरम्यान, राज्य सरकारमधील परब यांच्यासहित किमान 11 मंत्र्यांवर गंभीर आरोप सोमय्या यांनी करत महाविकास आघाडी सरकारचा डेरा डळमळीत करण्याचे काम केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील नेते रडारवर
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपने सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले आहे. तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सरकारमधील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करत विविध प्रकरण चव्हाट्यावर आणली आहेत. आता सोशल मिडियाच्या माध्यमातून 11 नेत्यांची नावे किरीट सोमय्या यांनी जाहीर केली. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना लवकरच ईडी ( सक्तवसुली संचालनालय) किंवा सीबीआय कारवाई करुन अटक करणार असल्याची भाकित सोमय्या यांनी वर्तवले आहे. येत्या काळात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या चौकशीचा सिलसिला पहायला मिळणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले होते.
केंद्रीय मंत्री परबांच्या अडचणी वाढणार
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी वांद्रे पुर्वेकडील गांधी नगरमधील इमारत क्रमांक 57 आणि 58 मधील मोकळी जागा बळकावून अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी लोकायुक्तांकडे दाद मागितली होती. लोकायुक्तांनी याबाबत झालेल्या सुनावणीवेळी गृहनिर्माण विभागाला एका महिन्याच्या आत कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती सोमय्या यांनी प्रसार माध्यमांना दिली. म्हाडाने यासंदर्भात यापूर्वी नोटीस बजावल्या होत्या. त्यावेळी संबंधित अनधिकृत बांधकामाशी माझा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर म्हाडाने त्या मागे घेतल्या. आताही म्हाडाकडून योग्य कारवाई होईल, असे सांगत परिवहन मंत्री परब यांनी हात झटकले आहेत.
लोकायुक्तांच्या आदेशानंतर म्हाडा काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच रत्नागिरी येथील दापोली येथे लॉकडाऊन काळात १० कोटींचा बेकायदेशीर रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी यापूर्वी केला होता. सीबीआय आणि आयकर विभागाकडे तशा तक्रारी केल्या आहेत. सचिन वाझे प्रकरणातही परब यांचा हात असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेप्रकरणी परब यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप भाजपकडून केला. त्यानंतर परब आणि पोलिसांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने परब यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जाते.
ठाकरे सरकारची ही "महान इलेव्हन" टीम किरीट सोमय्या यांचा टोला
कोण आहेत रडारवर
माजी गृहमंत्री अनिल देशमुख
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल मालकांकडून अवैधरित्या शंभर कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावरकेला होता. 20 मार्च रोजी परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा आरोप केला. या आरोपानंतर उच्च न्यायालयात देखील याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. या आधारावर ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर 2 जुलैला छापेमारी करण्यात आली. मुंबई, नागपूर आणि गृहमंत्री असताना त्यांना देण्यात आलेले शासकीय निवासस्थानी हे धाडसत्र करण्यात आले. या धाडीनंतर देशमुख यांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे, यासाठी वेळोवेळी समन्स बजावण्यात आला आहे. सचिन वाजे याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
प्रताप सरनाईक-
प्रताप सरनाईक यांनी एनएसईएल मध्ये अडीचशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. या घोटाळ्यांच्या पैशातून त्यांनी जमीन खरेदी केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला. याबाबत ईडीकडून प्रताप सरनाईक यांच्या ठाण्याच्या आणि मुंबईच्या अशा दोन्ही घरांवर छापेमारी करण्यात आली. याबाबत वेळोवेळी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलांना देण्यात आले आहेत.
रवींद्र वायकर-
रवींद्र वायकर यांनी अलिबाग मधील कोलई गावात अन्वय नाईक यांच्याकडून ३० जमिनीचे करार करण्यात आले. हे जमिनीचे करार, ग्रामपंचायतमध्ये केलेले अर्ज, रजिस्ट्रेशन, त्यांच्यावरील १९ बंगले याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही सर्व माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 19 बंगल्यांची प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी रवींद्र वायकर यांच्या पत्नीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाची कागदपत्र सादर करण्यात आली आहेत. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या प्रतिज्ञापत्रमध्ये काहीही उल्लेख केलेला नाही. या प्रॉपर्टीबाबत रवींद्र वायकर आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
भावना गवळी
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष ट्रस्टचे परिवर्तन महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये केले. हे परिवर्तन करत असताना भावना गवळी यांनी खोटी कागदपत्र सादर केली. खोटी कागदपत्रे सादर करून ट्रस्टचे रूपांतर कंपनीमध्ये केले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. हा घोटाळा जवळपास शंभर कोटी असल्याचा अंदाजही किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलाय.
मुंबई महापौर किशोरी पेडणेकर
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत येणार्या सनदी का मधून मुंबईतील जवळपास सहा फ्लॅट लाटल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 2003 साली झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत वरळी मध्ये देण्यात आलेल्या 230 फ्लॅट मधील सहा फ्लॅट किशोरी पेडणेकर यांनी घेतले. यावेळी किशोरी पेडणेकर या प्रभागांमध्ये नगरसेविका होत्या. त्यावेळेस हा अपहार झाल्याच किरीट सोमय्या यांचा आरोप आहे. तसेच कोविड काळामध्ये महानगरपालिका अंतर्गत कोविड सेंटर उभारण्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचाही आरोप किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर केला आहे.
यशवंत जाधव आणि यामिनी जाधव
मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी दुबईत असलेल्या 'सिनर्जीत व्हेंचर्स' आणि 'सईद डोन शारजा' या दोन कंपन्यां तयार करून त्यात पैशांची गुंतवणूक केली आहे. या दोन्ही कंपन्या यशवंत जाधव कुटुंबीयांच्या असल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे. या कंपनीत पैसा लावण्यासाठी प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने जाधव यांना पैसे दिले. प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कोलकत्ता मधील मनी लॉन्ड्रिंग करणारी कंपनी असल्याचाही आरोप या वेळी किरीट सोमय्या यांनी केलाय. हा काळा पैसा नेमका यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांनी कोठून आणला? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड उपचारासाठी जे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते, तसेच इतर बाबतीत जे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात त्या कॉन्टॅक्ट मधून केलेल्या काळा बाजारातून हा पैसा उभा करण्यात आला. त्यानंतर या काळ्या पैशाला मनी लॉन्ड्रिंग करून दुबईत गुंतवणूक करण्यात आली आहे. जवळपास पंधरा कोटी रुपये दुबईच्या या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असल्याचा संशय आरोपही किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.
मिलिंद नार्वेकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी दापोली समुद्रकिनाऱ्या जवळ अनाधिकृत बंगला बांधला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्याची मंत्रालयात जाऊन भेट घेऊन त्याबाबत सविस्तर माहिती दिली असल्याचं किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या नंतर मिलिंद नार्वेकर यांनी बांधलेला अनधिकृत बंगला पाडला जाईल असे आश्वासन त्या अधिकाऱ्याकडून देण्यात आलं असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितल आहे. तसेच हा बंगला बांधण्याआधी मिलिंद नार्वेकर यांनी परवानगी घेतली नव्हती.
छगन भुजबळ
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी छगन भुजबळ यांच्या नाशिक मधील आम्रस्ट्रॉंग कंपनीची पाहणी केली. या कंपनीच्या जमिनी खरेदी मध्ये देखील अपहार झाल्याचा आरोप किरीट सोमया यांच्याकडून करण्यात आलाय. तसेच मुंबईमधील नरीमन पॉइंट येथे असलेल्या शंभर कोटी कोटींच्या छगन भुजबळ यांच्या इमारतीवर पीडी कडून कारवाई सुरू असल्याचं किरीट सोमय्या यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र ही कारवाई आपल्यावर झाली नसल्याचा छगन भुजबळ यांनी नंतर स्पष्ट केलं. तसेच सांताक्रुज येथे असलेली नऊ मजली इमारत भुजबळ कुटुंबीयांची असल्याचाही आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आले आहे. या इमारतीची पाहणी देखील किरीट सोमय्या यांनी केली आहे. तसेच भुजबळ कुटुंबीयांनी 2009 ते 2014 साला दरम्यान केलेल्या भ्रष्टाचाराचा पैसा दुबईच्या बोगस सेल्स कंपन्यांमध्ये वळवला असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड
गृहनिर्माण विभागाचा कारभार मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांभाळल्यानंतर गृहनिर्माण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या निकटची व्यक्ती काही बिल्डरांना हाताशी धरून मोठा भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. लवकरच याबाबत सबळ पुराव्या सहित पत्रकार परिषद घेऊन आपण सदरचे प्रकरण समोर आणणार असल्याचं किरीट सोमय्या यांच्याकडून सांगण्यात आला आहे.
हेही वाचा - किरीट सोमैयांची पत्रकार परिषद, महाविकास आघाडीतील नेत्यांचा घोटाळा काढणार बाहेर?
हेही वाचा - राज्याचे महाधिवक्ता कुंभकोणी यांच्या कार्यप्रणालीवर नाना पाटोलेंचा संशय
हेही वाचा - गुजरातमध्ये परत पाटीदारांची सत्ता..! कोण आहेत भूपेंद्र पटेल? जाणून घ्या..