मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीत ( Rajya sabha election 2022 ) सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीला ( Maha Vikas aghadi ) मतांची जुळवाजुळव करावी लागत आहे. असे असताना बहुजन विकास आघाडीच्या ( bahujan Vikas aghadi ) हितेंद्र ठाकूर यांच्यावर ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीची मते कोणाच्या पारड्यात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही मते ईडीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भाजपकडे वळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीची आता डोकेदुखी वाढली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
घोडेबाजार झाल्यास शिवसेना फटका - राज्यसभेची निवडणूक येत्या १० जूनला होत आहे. भाजपचे तीन, शिवसेना दोन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे. एकूण सात उमेदवार निवडणूक लढत असल्याने, सहावी जागेवर कोण बाजी मारणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपकडे तिसऱ्या उमेदवारसाठी पुरेसे मताधिक्क नाही. शिवसेनेचा उमेदवार अपक्षांच्या जोरावर सहावा आणि शिवसेनेचा दुसरा उमेदवार म्हणून निवडून येऊ शकतो. मात्र घोडेबाजार झाल्यास शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हितेंद्र ठाकूर यांची घेतली महाडिक यांनी भेट - बहुजन विकास आघाडीने विशेषत: हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला होता. सध्या हितेंद्र ठाकूर यांच्यावर ईडीची टांगती तलवार आहे. बविआने आपली मते आघाडीला दिल्यास कारवाईचा ससेमिरा लागू शकतो. त्यामुळे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश ठाकूर हे भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी ठाकूर यांची आज भेट घेतली. तब्बल दीड तास चर्चा झाली. त्यामुळे ठाकूर कोणाला मतदान करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.