मुंबई - २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या शहीद पोलीस अधिकारी व जवानांच्या कुटुंबियांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लॅपटॉप भेट देण्यात आले. हे लॅपटॉप वाटप राजभवनमधील कार्यक्रमात करण्यात आले.
मुंबईवरील २६/११ हल्ल्याला आज १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या अधिकारी व जवानांच्या कुटुंबियांना लॅपटॉप वाटपासाठी जीवनज्योत प्रतिष्ठान या संस्थेने पुढाकार घेतला. लॅपटॉप वाटपाच्या राजभवनमधील कार्यक्रमाला लोकसभेचे प्रतापगड येथील खासदार संगमलाल गुप्ता उपस्थित होते. तसेच आमदार मंगल प्रभात लोढा, जीवनज्योत प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरजी पटेल आदि उपस्थित होते.
हेही वाचा-'26/11' मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण; हल्ला झालेल्या ठिकाणची जाणून घ्या स्थिती
संविधान दिनानिमित्त राजभवनवर उद्देशिकेचे सामूहिक वाचन -
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संविधान दिनानिमित्त राजभवन येथे राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
हेही वाचा-मुंबईत 1 हजार 144 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 17 रुग्णांचा मृत्यू
मुंबईवरील २६/११ हल्ल्याला आज १२ वर्षे पूर्ण-
२६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री अचानक सुरू झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने मुंबई हादरली. २६/११ च्या या काळरात्री दहशतवाद्यांनी दोन हॉटेल, रेल्वे स्टेशन, रुग्णालय, ज्यूंचे प्रार्थनास्थळ छाबडा हाऊसवर हल्ला केला. सुरवातीला कुणाला हा हल्ला एवढा मोठा असेल असं वाटलं नाही. पण बघता बघता जगभरात या हल्ल्याचे गांभीर्य पसरले. या हल्ल्याला आज १२ वर्षे पूर्ण होत आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीवरील हल्ल्याच्या कटू आठवणी आजही मुंबईकरांच्या स्मरणात आहेत. देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन मानले जाणाऱ्या मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे १९७ नागरिक बळी पडले होते. तर सुमारे ६०० नागरिक जखमी झाले होते. त्यावेळी मुंबई पोलीस दलातील महत्त्वाचे अधिकारी दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत शहीद झाले.