मुंबई : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या एका रिकाम्या गॅस ट्रकचा टायर फुटल्यामुळे मोठा अपघात झाला. यानंतर हा ट्रक महामार्गाच्या शेजारुन जाणाऱ्या रेल्वे रुळांवर जाऊन पडला. यामुळे कसारा कल्याण भागात मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक कोंडी झाली होती. काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही दोन तासांपर्यंत उशीर झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ट्रक क्लिनरच्या सतर्कतेमुळे टळलं मोठं नुकसान..
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक क्लिनरच्या सतर्कतेमुळं मोठं नुकसान टळलं. अपघात झाल्या-झाल्या दिलीप वाघ या क्लिनरने तातडीने कंट्रोल रुमला याबाबत माहिती दिली. त्यामुळे तातडीने या मार्गावरील गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. सुदैवाने हा अपघात झाला तेव्हा त्या मार्गावरुन कोणतीही ट्रेन जात नव्हती. इथून जाणारी एक गाडी मागच्या स्टेशनपर्यंत पोहोचली होती असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
सेंट्रल रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात आसनगाव आणि आतगाव या दोन स्थानकांच्या मध्ये घडला. सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास या अपघाताची माहिती मिळाली होती. त्यानंतर ७.४० पासून पुढे या मार्गावरील वाहतुक थांबवण्यात आली होती, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. यानंतर महाराष्ट्र आपत्ती नियंत्रण पथकाच्या मदतीने रुळांवरील हा ट्रक हटवण्यात आला. यासाठी रेल्वेच्या क्रेन आणि मदत वाहनेही घटनास्थळी पाठवण्यात आली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दोन तासांमध्ये वाहतूक सुरळीत..
हा ट्रक हटवल्यानंतर नऊ वाजून दहा मिनिटांनी कसाराच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूनक सुरुवात करण्यात आली. तर साडेनऊ वाजता अप लाईनवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. हा टँकर मोकळा असल्यामुळे त्याला हटवण्यासाठी जास्त अडचण आली नाही. पोलीस या अपघाताबाबत अधिक तपास करतील, असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हेही वाचा : केंद्रीय मंत्रिमंडळाचा ७ जुलैला विस्तार; महाराष्ट्रातून कोणाला मिळणार मंत्रिपद?