मुंबई - राज्य निवडणूक आयोगाने मुंबई, नवी मुंबई, वसई- विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हसनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना अंतिम झाली असून ती राजपत्रात प्रसिध्द झाल्याचेही आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने संबंधित महापालिकांना दिला आहे. अनुसूचित जाती, आणि अनुसूचित जमतीसाठीच्या राखीव प्रवर्गासाठी अंतिम प्रभाग रचनेनुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचा उतरता क्रम विचारात घेणे आवश्यक असून त्यानुसार आरक्षण सोडत काढण्यात यावी, असे या आदेशात स्पष्ट केले आहे.
आगामी निवडणुका ओबीसींच्या आरक्षांशिवाय होणार - राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून जोपर्यंत राज्य सरकार ओबीसी जनगणनेची त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गासाठी प्रभाग राखीव ठेवता येत नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ओबीसींच्या आरक्षांशिवाय होणार आहेत हे स्पष्ट झाले आहे.
आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी ३१ मे ही तारीख निश्चित - अनुसूचित जाती आणि जमाती आरक्षण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण चक्राकार पध्दतीने २७ मे रोजी जाहीर करण्याची मुदत देण्यात आली आहे. तर आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी ३१ मे ही तारीख निश्चित केली आहे. याशिवाय निश्चित करण्यात आलेल्या जागांची माहिती प्रसिध्द करण्यासाठी १ जून ही तारीख देण्यात आली आहे. तसेच त्यावरील हरकती व सूचना मागविण्यासाठी १ ते ६ जून पर्यंत मागविण्याची सूचना केली आहे. त्यानंतर आलेल्या हरकती व सूचनांवर निर्णय घेवून त्याबाबतचा अंतिम निर्णय १३ जून रोजी राजपत्रात जाहिर करण्याचे आदेश आयोगाने या १४ महापालिकांना दिले.
हेही वाचा - नव्या प्रभाग रचनेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा, मुंबई उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश